लोकसभेच्या बदल्यात लॉलीपॉप; रामदास कदमांच्या मुलाला मोठी जबाबदारी मिळताच वडेट्टीवार भडकले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 03:56 PM2024-03-08T15:56:56+5:302024-03-08T16:03:45+5:30
रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Congress Vijay Wadettiwar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत भाजप ३० पेक्षा अधिक जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याने मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीची अडचण झाली असून शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर उघडपणे निशाणा साधला. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपला आक्रमक इशारा दिला होता. त्यानंतर रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारकडून करण्यात आलेली ही नियुक्ती आता वादात सापडली असून काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
सिद्धेश कदम यांच्या नियुक्तीवरून सरकावर निशाणा साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराज नेत्यांच्या मुलांना खुश ठेवण्यासाठी 'लॉलीपॉप'वाटप सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियम डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जागा वाटपावरून गेले काही दिवस रामदास कदम भाजपवर टीका करत आहेत आणि आता त्यांच्या मुलाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून लॉलीपॉप देण्याचा हा प्रयत्न दिसत आहे," अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे.
"लोकसभा जागांच्या बदल्यात भाजप-शिंदे आणि अजित पवार गटातील नाराज नेत्यांना सरकारी पद वाटून सेटलमेंट करण्यासाठी ही शासकीय पदे आहे का?" असा खोचक सवालही विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराज नेत्यांच्या मुलांना खुश ठेवण्यासाठी "लॉलीपॉप" वाटप!
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 8, 2024
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियम डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली…
दरम्यान, रामदास कदम यांनी नुकतीच भाजपवर घणाघाती टीका केली होती. "महाराष्ट्रात आम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी असो हे पक्ष मोदी-शाह यांच्या कामावर विश्वास ठेऊन सोबत आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही याची दक्षता भाजपाने घेणे आवश्यक आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. ज्या आमच्या विद्यमान जागा आहेत तिथे काही भाजपची मंडळी आम्हीच उमेदवार आहोत असं सांगत आहेत. तालुक्यात, मतदारसंघनिहाय जातात तिथे हे सुरू आहे ही माझी खंत आहे. रत्नागिरी, रायगड, मावळ, संभाजीनगर याठिकाणी हे सुरू आहे. हे जे चाललंय ते महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून घृणास्पद कृत्य सुरू आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. परंतु तुमच्यावर विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसाने गळा कापू नका," असा हल्लाबोल कदम यांनी केला होता.