देशात 'मी' करणाच्या विरोधात समीकरण; काँग्रेस नेते मातोश्रीवर, ठाकरेंची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 10:19 PM2023-04-17T22:19:23+5:302023-04-17T22:19:41+5:30
भाजपला सत्तेचा हव्यास सत्ताभक्षक झाले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटात सावरकर मुद्द्यांवरून वाद होता. मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे राहुल गांधींना इशारा दिला. त्यानंतर काँग्रेसनेही सामंजस्याची भूमिका घेत सावरकर मुद्दा घेणार नसल्याचं सांगितले. त्यानंतर आज मातोश्रीवर काँग्रेसचे महासचिव के. सी वेणुगोपाळ यांच्यासह राज्यातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा भेटीचा उद्देश वेणूगोपालजींनी स्पष्ट केला. देशात 'मी'करणाच्या विरोधात एक समीकरण बनतंय. म्हणून सर्व पक्ष एकत्र प्रत्येक पक्षाचे स्वतः ची विचारधारा आहेच. त्यालाच लोकशाही म्हणतात म्हणून आम्ही एकत्र आलोय. निवडणुका समोरच उभ्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मागे भाजपचे अध्यक्ष नड्डा बोललेले फक्त भाजप राहील इतर सगळे पक्ष संपतील. शिवसेना संपवावी यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. भाजपला सत्तेचा हव्यास सत्ताभक्षक झाले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे. विरोधी पक्षांची चर्चा होतच असते. आम्ही मैत्री करतो तर पूर्ण मनापासून निभवतो एक नाते निर्माण होतो. भाजपासोबत २५-३० वर्ष होतो पण होतो पण त्यांना किंमत नव्हती पण ठिक आहे त्यांना मित्र आणि शत्रू समजले नाहीत. लोकांच्या मनात प्रश्न आहेत ते आपल्याला साथ देतील. आमच्या भेटीगाठी सुरु राहतील असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आम्ही ठाकरेंसोबत - काँग्रेस
मी मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा निरोप घेऊन आलो आहे. उद्धव ठाकरे यांच्या संघर्षात आम्ही सोबत आहोत. देशात लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. ईडी, सीबीआय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. लोकशाही वाचवण्यासाठी लढाई आम्ही एकत्र लढणार आहोत. संसदेचं कामकाज सुरळीत चालू देत नव्हते. सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे ही लढाई लढत आहे असं के. सी वेणुगोपाल यांनी म्हटलं.