केंद्र सरकार नफेखोरी करते; कबूल करायला का घाबरता? काँग्रेसने शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 07:20 PM2023-07-19T19:20:33+5:302023-07-19T19:21:44+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2023: केंद्र सरकारची नफेखोरी सुरु आहे. शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली.
Maharashtra Assembly Monsoon Session 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती कमी झालेल्या असतानाही केंद्र सरकारकडून खतांच्या बाबतीमध्ये नफेखोरी सुरू आहे, शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे आणि कृषिमंत्री केंद्र सरकारची ही नफेखोरी कबूल करायला का तयार नाही? आपण कोणाला घाबरता? असा सवाल करून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना चांगलेच कोंडीत पकडले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. प्रश्नोत्तराच्या तासात बोगस बी बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किंमतीवरून काँग्रेस नेत्यांनी कृषीमंत्र्यांना घेरले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खतांच्या वाढलेल्या किंमतीवर बोट ठेवत धनंजय मुंडे यांच्याकडून उत्तराची अपेक्षा केली. त्यावर धनंजय मुंडे यांनी खतांच्या किंमती वाढलेल्या नसून त्या स्थिर आहे अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यावर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या वाढलेल्या किमतीला केंद्र सरकार जबाबदार आहे हे कबूल करायला तुम्ही का घाबरता असा घणाघात केला.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे
बाळासाहेब थोरात यांनी, ‘बियाण्यांचा काळाबाजार होत असल्यामुळे आणि बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, हा मुद्दा सलग तिसऱ्या दिवशीही सभागृहात उपस्थित केला. ‘बोगस बियाण्यांवर कारवाईच्या नावाखाली ज्या सरकारी टोळ्या राज्यभर फिरत होत्या ज्याच्यामध्ये काही मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सहभागी होते, त्या बोगस डोळ्यांवर सरकारने नेमकी काय कारवाई केली त्याची सभागृहाला माहिती द्यावी, असाही आग्रह कृषी मंत्र्यांकडे धरला.