काँग्रेसला ४० जागा सोडल्या, ‘वंचित’ आघाडीचा प्रस्ताव!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 04:08 AM2019-07-04T04:08:48+5:302019-07-04T04:09:04+5:30

वंचित आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी दादर येथील आंबेडकर भवनात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली.

 Congress leaves 40 seats, 'deprived' front | काँग्रेसला ४० जागा सोडल्या, ‘वंचित’ आघाडीचा प्रस्ताव!

काँग्रेसला ४० जागा सोडल्या, ‘वंचित’ आघाडीचा प्रस्ताव!

Next

मुंबई : जागावाटपाबाबत काँग्रेस नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर वंचित बहुजन आघाडीने बुधवारी नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नसताना काँग्रेस नेते माध्यमात विधाने करत आहेत. वंचित आघाडीला बदनाम करण्यासाठीच अशी परस्पर विधाने केली जात आहेत. आम्हाला जागा सोडण्याची भाषा करणा-या काँग्रेसलाच आम्ही ४० जागा सोडत आहोत, या प्रस्तावावर त्यांनी दहा दिवसांत निर्णय घ्यावा, असे आव्हानच वंचित बहुजन आघाडीने बुधवारी काँग्रेसला दिले.
वंचित आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी दादर येथील आंबेडकर भवनात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस, जाणीवपूर्वक वंचित आघाडीला बदनाम करत आहे. विधानसभेच्या जागावाटपाबाबत आघाडीचा कोणताही पदाधिकारी काँग्रेसला भेटला नाही. तरीही काँग्रेस नेत्यांकडून जाणीवपूर्वक माध्यमातून उलटसुलट चर्चा घडवून आणल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीची मते पाहता आता आम्हीच काँग्रेसला किती जागा सोडणार हे ठरवणार आहोत, असे पडळकर म्हणाले.
ईव्हीएमसह अनेक मुद्द्यांवर काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. विविध आरोपांत अडकलेल्या काँग्रेस नेत्यांचा भाजप खुबीने वापर करून घेत आहे. अशा विविध कारणांमुळे कॉंग्रेसबद्दल आमच्या मनात संभ्रम असल्याचे पडळकर म्हणाले. शिवाय, आता २०१४ सारखी स्थिती नाही. २०१९च्या निवडणुकीचे चित्र वेगळे असणार आहे. ज्यांना काँग्रेस किंवा भाजपकडून तिकीट मिळणार नाही, असे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. वंचित भाजपची बी टीम असल्याचा आरोप करणारे काँग्रेस नेते अद्याप त्याबाबत खुलासा करू शकले नाहीत. वंचितला मिळालेल्या मतांमुळे काँग्रेस घाबरल्याचा आरोपही पडळकर यांनी केला.

हे वक्तव्य गमतीशीर : काँग्रेस
वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या ४० जागा देण्याचे केलेले वक्तव्य अत्यंत गंमतीशीर आहे. सामाजिक ऐक्य आणि लोकशाहीला अभूतपूर्व धोका निर्माण झालेला असताना पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी काँग्रेस गांभीर्याने प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्ष ज्या गांभीयार्ने विचार करत आहे त्याच गांभीर्याने इतर पक्षांनीही विचार करावा अशी अपेक्षा आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी वंचितच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

Web Title:  Congress leaves 40 seats, 'deprived' front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.