खरगे जाणून घेणार काँग्रेस आमदारांची मते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 05:18 AM2019-11-07T05:18:51+5:302019-11-07T05:19:38+5:30
काँग्रेसला तत्वाचे राजकारण हवे की वास्तवाचे याचा निर्णय घ्यावा लागेल
अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यात कोणत्याही परिस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री नको, या मुद्यावर काँग्रेसचे ४४ पैकी ३५ आमदार एकवटले आहेत. बिगर भाजप सरकारला पाठिंबा देण्यासंदर्भात पत्रक काढण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. या घडामोडीनंतर पक्षाचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे मुंबईकडे निघाले असून गुरुवारी ते सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत.
काँग्रेसला तत्वाचे राजकारण हवे की वास्तवाचे याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका काही तरुण आमदारांनी घेतली आहे. भाजपने आजवर ज्या पद्धतीने राजकारण केले, तेच पुढेही झाले तर आमचे राजकीय अस्तित्वच शिल्लक राहाणार नाही, मग तत्वाचे राजकारण कोणासाठी करायचे? पक्षात कोणी शिल्लक राहिल का? अशी टोकाची भूमिका या आमदारांनी बोलून दाखवली. विश्वजीत कदम, अमित देशमुख, सतेज पाटील हे युवानेते प्रदेशाध्यक्ष बाळासोहब थोरात, प्रभारी खरगे यांना भेटून पक्षाची भूमिका तातडीने स्पष्ट करा, असे सांगणार असल्याचे समजते.
राऊत यांना दलवाई भेटले
खा. हुसेन दलवाई यांनी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले, दलित, मुस्लीम समाजावर भाजपच्या काळात प्रचंड अन्याय झाला. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये हेच आपले मत आहे. ते पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही कळवले आहे. आमचे नव्याने निवडून आलेले जवळपास सगळे आमदार याच मताचे आहेत.
राज्यात भाजपचे सरकार आणि भाजपचा मुख्यमंत्री नको, ही आपली भूमिका आहे. काँग्रेसचे बहुसंख्य आमदार याच मताचे आहेत. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी जो निर्णय देतील तो मान्य असेल.
- अशोक चव्हाण, माजयी मुख्यमंत्री