माझी अंत्ययात्राही काँग्रेसच्याच झेंड्यातून निघेल; पक्षांतराची चर्चा रंगताच भाई जगतापांनी मांडली बाजू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:19 PM2024-02-12T21:19:54+5:302024-02-12T21:20:13+5:30
काँग्रेस सोडण्याची चर्चा रंगताच भाई जगताप यांनी खुलासा करत आपण शेवटच्या श्वासापर्यंत पक्षासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Congress Bhai Jagtap ( Marathi News ) :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील अन्य काही आमदारही पक्षातून बाहेर पडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये मुंबईत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार भाई जगताप यांच्याही नावाचा समावेश होता. काँग्रेस सोडण्याची चर्चा रंगताच भाई जगताप यांनी खुलासा करत आपण शेवटच्या श्वासापर्यंत पक्षासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. माझी अंत्ययात्राही काँग्रेसच्याच झेंड्यातून निघेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
पक्षबदलाच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना भाई जगताप यांनी म्हटलं आहे की, "मी काँग्रेस सोडणार अशा वावड्या काही नतद्रष्ट पसरवत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की माझ्या विद्यार्थी दशेपासून खांद्यावर घेतलेला हा काँग्रेसचा तिरंगा मी कधीही खाली ठेवणार नाही. पद, लालच आणि फायद्याकरिता माझा पिंड बनलेला नाही आणि मी कोणाच्या बापाला घाबरतही नाही. अनेक वादळं आली आणि गेली, काँग्रेस कोणीही संपवू शकलं नाही आणि कोणाच्याने संपणारही नाही," असं म्हणत भाई जगताप यांनी आपण काँग्रेससोबत ठामपणे उभं असल्याचं सांगतिलं आहे.
भाई जगताप काँग्रेस सोडणार अश्या वावड्या काही नतद्रष्ट पसरवत आहेत...
— Bhai Jagtap - भाई जगताप (@BhaiJagtap1) February 12, 2024
मी त्यांना सांगू इच्छितो की माझ्या विद्यार्थी दशेपासून खांद्यावर घेतलेला हा काँग्रेस चा तिरंगा मी कधीही खाली ठेवणार नाही..
पद, लालच आणि फायद्याकरिता माझा पिंड बनलेला नाही.. आणि मी कोणाच्या बापाला घाबरतही…
दरम्यान, "काँग्रेस पक्षाला गतवैभव पुन्हा मिळवून देऊ त्याकरिता प्रचंड कष्ट घेऊ. माझी शेवटची शोभायात्रा काँग्रेस पक्षाच्या तिरंगा झेंड्यातूनच निघेल याची सर्वांनी खात्री बाळगा," असंही भाई जगताप यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. पुढील दोन दिवसांत मी याबाबत निर्णय घेईन, असं त्यांनी म्हटलं आहे.