''काँग्रेसने शिवसेनेसोबत सत्तास्थापन करु नये''
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 03:30 PM2019-11-10T15:30:59+5:302019-11-10T15:37:05+5:30
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबई: राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. त्यातच आज राज्यपालांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सोमवारी (11 नोव्हेंबर)ला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे. यानंतर पुन्हा भाजपा- शिवसेनेच्या नेताच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. त्यातच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र काँग्रेसने शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षासाठी घातक ठरु शकतं असं विधान मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे.
संजय निरुपम म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमताचा आकडा नसल्याने सरकार स्थापन करणं कठीण आहे. तसेच आघाडीला बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर शिवसेनेनं पाठिंबा देणं गरजेचं आहे. मात्र काँग्रेसने शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याचा विचार केला तर तो काँग्रेस पक्षासाठी घातक ठरु शकतं असं संजय निरुपम यांनी सांगितले आहे.
काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आज जयपूरमध्ये बैठकसुरू आहे. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांमध्ये एकमत झाले. या बैठकीला उपस्थित असलेल्या बहुतांश आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सहमती दर्शवली. मात्र सद्यस्थितीत याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात होणाऱ्या बैठकीमध्ये याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.