“सरकारने मनोज जरांगेंना फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”; काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 06:02 PM2024-02-14T18:02:51+5:302024-02-14T18:03:39+5:30

Congress Vs State Govt:सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला असा सवाल तेव्हाच केला होता, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.

congress nana patole asked state govt over manoj jarange patil protest for maratha reservation | “सरकारने मनोज जरांगेंना फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”; काँग्रेसचा सवाल

“सरकारने मनोज जरांगेंना फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”; काँग्रेसचा सवाल

Congress Vs State Govt: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले जात आहे. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव होत होता. प्रकृती खालवली असली तरी जरांगे यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तपासणी करण्यास नकार दिला. यातच विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना मनोज जरांगे यांच्या उपोषणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांची सरकारने फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत असे नवी मुंबईत जरांगे यांच्या लाखो कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले. दिलेला शब्द आपण पाळला असेही मुख्यमंत्री म्हणाले. जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या तर मग पुन्हा उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर का आली? अशी विचारणा यावेळी करण्यात आली.

मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला

सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला असा सवाल आम्ही त्याचवेळी केला होता याची आठवण नाना पटोले यांनी करून दिली. दुसरीकडे, राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला जनतेचे मोठे समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रात या यात्रेचे स्वागत धुमधडाक्यात होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची भाजपाने त्याची चिंता करु नये. भारत जोडो यात्रेलाही महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड समर्थन देऊन यात्रा ऐतिहासिक बनवली होती आताही असेच चित्र असेल, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
 

Web Title: congress nana patole asked state govt over manoj jarange patil protest for maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.