“भाजपा उमेदवारांचाही EVMवर विश्वास नाही, मतपत्रिकेवरच मतदान घ्यावे”; नाना पटोलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 07:23 PM2024-06-21T19:23:27+5:302024-06-21T19:24:06+5:30

Congress Nana Patole News: आतातरी भाजपा, केंद्र सरकार व निवडणुक आयोगाने गांभीर्य ओळखावे व मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

congress nana patole criticized bjp and central govt over evm | “भाजपा उमेदवारांचाही EVMवर विश्वास नाही, मतपत्रिकेवरच मतदान घ्यावे”; नाना पटोलेंची मागणी

“भाजपा उमेदवारांचाही EVMवर विश्वास नाही, मतपत्रिकेवरच मतदान घ्यावे”; नाना पटोलेंची मागणी

Congress Nana Patole News: ईव्हीएमवर जनतेचा विश्वास नाही त्यामुळे मतपत्रिकेवरच मतदान घ्यावे अशी मागणी देशभरातून केली जात आहे. पण भाजपा सरकार मात्र ईव्हीएमवरच निवडणूका घेत आहे. विरोधी पक्षांचेही ईव्हीएम वर आक्षेप आहेत पण आता भाजपाच्या उमेदवारांचाही ईव्हीएमवर विश्वास राहिलेला नाही. ईव्हीएमवर देशभरातून ८ उमेदवारांनी आक्षेप नोंदवला त्यात भाजपाचे तिघेजण आहेत. महाराष्ट्रातील डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपाचे उमेदवार आहेत. आतातरी भाजपा, केंद्र सरकार व निवडणुक आयोगाने गांभीर्य ओळखावे व मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था व NEET पेपरफुटीवरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठीण झाले आहे. सरकारने बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतक-यांची लूट सुरु आहे. NEETचे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भ्रष्टाचारी महायुती सरकारविरोधात काँग्रेसने राज्यभरात चिखल फेको आंदोलन केले, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. 

भाजपा सरकारने भ्रष्टाचार करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

राज्यातील भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. डीबीटी योजनेतून शेतकऱ्यांना किटकनाशके, स्प्रे पंप, खते, औषधे दिली जातात पण त्यात २७०० रुपयांच्या स्प्रे पंपची किंमत वाढवून ४५०० रुपये करण्यात आली इतर वस्तुही वाढीव दराने खरेदी करुन भ्रष्टाचार केला. या योजनेत बदल करायचा असल्यास कॅबिनेटची मंजुरी लागते असे कृषी आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले असता त्या कृषी आयुक्तांचीच बदली करण्यात आली. या योजनेतून ११ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ झाला असता पण भाजपा सरकारने भ्रष्टाचार करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, केंद्र सरकारने काही पिकांची एमएसपी वाढवली पण या वाढीचा महागाईशी तुलना केली असती अत्यंत तुटपुंजी वाढ आहे. महागाईच्या दराप्रमाणे ही एमएसपी वाढ नाही. डिझेल, खते, बियाणे, शेती साहित्यांच्या वाढलेल्या किमती पहाता शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही. राज्यात प्रचंड दुष्काळ आहे, शेतकऱ्यांच्या फळबागा उद्ध्वस्थ झाल्या आहेत पण सरकार मात्र दुष्काळसदृष्य परिस्थीती आहे म्हणून शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन काँग्रेसने शेतकऱ्यांना आधार दिला. NEET परीक्षा रद्द करा, पोलीस भरती पुढे ढकला. भाजपाच्या राज्यात सातत्याने पेपरफुटी होत आहे. नीट परिक्षेतही पेपरफुटला असल्याने ही परिक्षाच रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. आधी पेपरफुटलाच नाही असे केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केले पण राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली तेंव्हा केंद्र सरकारला जाग आली. काँग्रेसने केलेल्या आंदोलनात नीट परीक्षा रद्द करावी, अशी मागणीही केली आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

 

Web Title: congress nana patole criticized bjp and central govt over evm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.