“मणिपूरचा ‘म’ काढायला देशाच्या पंतप्रधानांना तीन महिने का लागले?”; काँग्रेसची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 06:37 PM2023-07-20T18:37:06+5:302023-07-20T18:38:23+5:30

Congress Nana Patole Manipur Violence: महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

congress nana patole criticized bjp and pm modi govt over manipur violence | “मणिपूरचा ‘म’ काढायला देशाच्या पंतप्रधानांना तीन महिने का लागले?”; काँग्रेसची घणाघाती टीका

“मणिपूरचा ‘म’ काढायला देशाच्या पंतप्रधानांना तीन महिने का लागले?”; काँग्रेसची घणाघाती टीका

googlenewsNext

Congress Nana Patole Manipur Violence: मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्य आणि केंद्र सरकारला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यातच विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. 

मणिपूर तीन महिन्यापासून जळत आहे पण देशाच्या पंतप्रधानांना लक्ष द्यायला वेळ नाही. मणिपूरमध्ये महिलेची धिंड काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा व्हिडिओ पाहून मन सुन्न झाले. ही घटना एका महिलेपुरती मर्यादीत नसून, हा समस्त महिला वर्गावरचा अत्याचार आहे. मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून राज्य सरकार व केंद्र सरकारला परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही. मणिपूरमध्ये हैवानांचे राज्य असून तेथील राज्य सरकार तात्काळ बरखास्त करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

केंद्र सरकार तर त्याकडे दुर्लक्षच करत आले आहे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. केंद्र सरकार तर त्याकडे दुर्लक्षच करत आले आहे. मणिपूर जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यात इव्हेंटबाजी करण्यात मग्न होते, त्यानंतर स्वदेशी येऊनही त्यांनी मणिपूरचा म सुद्धा काढला नाही. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्याने प्रसार माध्यमांसमोर त्यांनी मणिपूरवर केवळ काही मिनिटाचे भाष्य केले. मागील तीन महिने मणिपूर जळत आहे पण त्यावर बोलण्यास देशाच्या पंतप्रधानांना वेळ मिळाली नाही हे दुर्दैव आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, सर्वात संताप आणणारा प्रकार हा आहे की जे लोक स्वयंघोषीत हिंदूंचे रक्षणकर्ते म्हणवून घेत आहेत त्याच विचाराचे सरकार देशात व मणिपूर राज्यात असताना महिला मुलींना निर्वस्त्र करुन धिंड काढली जाते हे चीड आणणारे आहे. या सरकारला थोडीतरी शरम असेल तर मणिपूर सरकार तात्काळ बरखास्त करा व महिलेची धिंड काढून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी पटोले यांनी केली.


 

Web Title: congress nana patole criticized bjp and pm modi govt over manipur violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.