“आमच्याकडे माहिती, दुसऱ्यांना भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या BJPच्या भ्रष्ट चेहऱ्याचा पर्दाफाश करु”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 05:51 PM2023-08-05T17:51:24+5:302023-08-05T17:52:09+5:30

Congress Nana Patole Vs BJP: भ्रष्टाचाराचा आरोप मोदींनी केल्यावर २ दिवसांत सत्तेत सहभागी करुन घेता, भाजपकडे आले की पवित्र होतात का ? असा संतप्त सवाल करण्यात आला.

congress nana patole criticized bjp and warns to open leaders corruption cases soon | “आमच्याकडे माहिती, दुसऱ्यांना भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या BJPच्या भ्रष्ट चेहऱ्याचा पर्दाफाश करु”

“आमच्याकडे माहिती, दुसऱ्यांना भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या BJPच्या भ्रष्ट चेहऱ्याचा पर्दाफाश करु”

googlenewsNext

Congress Nana Patole Vs BJP: काँग्रेस पक्षासह देशातील महत्वाच्या पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत ही बैठक होत असून राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर होत असल्याने या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. बैठकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येकी ५ नेत्यांचा गट तयार करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा गट काम करणार असून मुंबईतील बैठक यशस्वी करण्यासाठी तिन्ही पक्ष जोमाने काम करत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

वरळीच्या नेहरू सेंटर येथे यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,  मुंबईत होणारी इंडियाची ही तिसरी बैठक आहे. मुंबईतील बैठक चांगली व्हावी यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. मुंबईतील बैठकीत विविध विषयांवर चर्चा होईल. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, संसदीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, यांच्यासह महत्वाच्या व्यक्ती या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारला माहिती देण्यात येईल, सरकारी व्यवस्थेसंदर्भात विरोधी पक्षनेते सरकारशी संवाद साधतील. देशात मागील ९ वर्षांपासून सुरु असलेल्या हुकूमशाही व्यवस्थेविरोधात इंडिया आघाडी स्थापन झालेली आहे. पाटणा व बंगळुरूतील बैठक यशस्वी पार पडल्यानंतर मुंबईतील बैठक यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे, असे नाना पटोले म्हणाले.

तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी पाच नेत्यांचा समावेश असेल

मुंबईतील इंडिया आघाडीची बैठक यशस्वी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार असून या समितीत तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी पाच नेत्यांचा समावेश असेल. काँग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खा. संजय निरूपम हे या समितीचे सदस्य असणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. 

भ्रष्टाचाराची माहिती आमच्याकडे, लवकरच पर्दाफाश केला जाईल

पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, दुसऱ्यांना भ्रष्ट्चारी म्हणणाऱ्या भाजपाचा भ्रष्ट चेहरा आम्ही उघड करणार आहोत. शिंदे सरकारमध्ये भाजपचे अनेक मंत्री भ्रष्टचारी आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती आमच्याकडे आहे, लवकरच त्यांचा पर्दाफाश केला जाईल. जलसंपदा विभागात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप देशाचे पंतप्रधान करतात व दोन दिवसातच त्या पक्षाला सत्तेत सहभागी करुन घेता, हे कसे काय ? भाजपकडे आले की पवित्र होतात का ? असा संतप्त सवाल पटोले यांनी विचारला.

दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनिल देसाई आदी उपस्थित होते.


 

Web Title: congress nana patole criticized bjp and warns to open leaders corruption cases soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.