स्वतःच्या पक्षाचा पत्ता नसलेल्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये; नाना पटोलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 02:28 PM2022-10-06T14:28:47+5:302022-10-06T14:29:16+5:30

एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबरचे ४० आमदारही या सरकारमध्ये होते. काँग्रेसचा पाठिंबा एवढा नकोसा होता तर त्याचवेळी बाहेर पडण्याचे धाडस का केले नाही? असा सवाल काँग्रेसनं विचारला.

Congress Nana Patole Criticized CM Eknath Shinde over Dasara Melava | स्वतःच्या पक्षाचा पत्ता नसलेल्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये; नाना पटोलेंचा टोला

स्वतःच्या पक्षाचा पत्ता नसलेल्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये; नाना पटोलेंचा टोला

Next

मुंबई - मुंबईतील बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यातील विविध भागातून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन भाडोत्री गर्दी जमवण्यात आली होती. परंतु या जनतेने शिंदेचे भाषण न ऐकताच काढता पाय घेतला. राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने पाहिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गद्दारीचे समर्थन करत भारतीय जनता पक्षाने लिहून दिलेल्या स्क्रिप्टचे वाचन केले असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यात काँग्रेस पक्षावर टीका केली. वास्तविक पाहता एकनाथ शिंदे यांची गद्दारी हा त्यांचा व शिवसेना पक्षाचा अंतर्गत विषय आहे. परंतु आपल्या बंडखोरीचे पाप झाकण्यासाठी एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक मंत्री, आमदार वारंवार काँग्रेसवर टीका करत आहेत ते आम्ही खपवून घेणार नाही. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण आहे किंवा असावा याची चिंता एकनाथ शिंदे यांनी करु नये. एकनाथ शिंदे यांना स्वतःचा पक्ष कोणता आहे हे नाही त्यांनी काँग्रेसवर बोलणे हास्यास्पद आहे. काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना, अनुभवी तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा व देशाला जगात ताठ मानेने उभा करण्यात सिंहा वाटा असलेला पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांची कामगिरी काहीही नाही. भाजपाच्या इशाऱ्यावर काम करणे व दिल्लीच्या आदेशाची अंमलबजावणी करणे एवढेचे त्यांचे कर्तृत्व आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने २०१९ साली निवडून आणलेल्या आमदारांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवून राज्यातील जनतेच्या हितासाठी हे सरकार स्थापन केले होते. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबरचे ४० आमदारही या सरकारमध्ये होते. काँग्रेसचा पाठिंबा एवढा नकोसा होता तर त्याचवेळी बाहेर पडण्याचे धाडस का केले नाही? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगता पण याच बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता हे एकनाथ शिंदे यांना माहित नाही का? त्यावेळीही विरोध करण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांनी केले होते का? स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा व भाजपाच्या सल्ल्यावर मान डोलावणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला दोष देणे थांबवावे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
 

Web Title: Congress Nana Patole Criticized CM Eknath Shinde over Dasara Melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.