Maharashtra Political Crisis: शेतकऱ्यांना डिझेलवर सबसीडी देण्याचा राज्य सरकारने विचार करावा!; नाना पटोलेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 03:37 PM2022-08-18T15:37:38+5:302022-08-18T15:38:40+5:30
राज्य सरकारने डिझेलवर शेतकऱ्यांना सबसीडी देण्याचा विचार करून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
मुंबई: महागाईने जनता त्रस्त असून पेट्रोल, डिझेलचे दर अजूनही जास्तच आहेत. शेतकरी नेहमीच संकटाचा सामना करत असतो. शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच इतर शेती कामासाठीही डिझेलचा वापर केला जातो. सध्याचे डिझेलचे दर जास्त असून शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. राज्य सरकारने डिझेलवर शेतकऱ्यांना सबसीडी देण्याचा विचार करून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
विधिमंडळातील चर्चेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, जीएसटीची व्याप्ती वाढवून केंद्र सरकार अनेक जिवनावश्यक वस्तूही जीएसटीच्या कक्षेत आणून कराचे ओझे सामान्य जनतेवर टाकत आहे. कर कमी करून पेट्रोल- डिझेलचे दर काही प्रमाणात कमी केले असले तरी अजूनही शेजारच्या राज्यातील पेट्रोल डिझेलच्या दरांशी तुलना करता महाराष्ट्रातील दर हे जास्तच आहेत. दूध, दही, पनीर, आटा यासह शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. शहरी भागात १५ हजार रुपये महिना कमावणाऱ्या कुटुंबालाही या महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती पहाता पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा तसेच शेतकऱ्यांनाही डिझेलवर सबसीडी देण्यासंदर्भात विचार करावा व तसा निर्णय घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे नाना पटोले म्हणाले.