Nana Patole on BJP: ‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणाऱ्या भाजपलाही सहआरोपी करा; नाना पटोलेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:55 PM2022-04-12T16:55:26+5:302022-04-12T16:56:30+5:30
Nana Patole on BJP: भाजपने जनतेचा विश्वासघात असून खोटे बोलून वसुली केली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
मुंबई: युद्धनौका आयएनएस ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली भाजप (BJP) व किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या पैशांचा हिशोब जनतेला दिला पाहिजे. किरीट सोमय्या यांनी जमा केलेला निधी भारतीय जनता पक्षाला दिला असे सांगितले आहे. सर्वसामान्य जनतेचा हा विश्वासघात असून, तो गंभीर गुन्हा आहे. किरीट सोमय्यांनी हा निधी भारतीय जनता पक्षाला दिला असेल तर या पक्षाची व या पक्षाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तसेच खजिनदाराची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, आयएनएस ‘विक्रांत बचाव’च्या मोहिमेअंतर्गत १४० कोटी रुपये जमा करण्याचा किरीट सोमय्या यांचा निर्धार होता. त्यासाठी किरीट सोमय्या व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हातात डबे घेऊन सर्वसामान्य लोकांकडून ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली रोख पैसे जमा केले, या पैशांची कोणतीही पावती लोकांना दिलेली नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतल्याचेही स्पष्ट झालेले नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
खोटे बोलून वसुली केली आहे
जनतेकडून जमा केलेली रक्कम राजभवन, राष्ट्रपतीभवन अथवा संरक्षण मंत्रालय यापैकी कोणाकडेही जमा न करता जनतेचा हा पैसा सोमय्या यांनी भारतीय जनता पक्षाकडे जमा केल्याचे किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आलेल्या आहेत. हा जनतेचा विश्वासघात असून खोटे बोलून वसुली केली आहे. जर भारतीय जनता पक्षाने हा पैसा घेतला असेल तर तोही गुन्हाच आहे म्हणून भारतीय जनता पक्ष व त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर कारवाई झाली पाहिजे. ‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी करा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली भाजपने जनतेच्या भावनेशी खेळ केला आहे. सोमय्या यांच्या वकिलाच्या दाव्यानुसार ११ हजार रुपये जमा केल्याचे समजते पण ही रक्कम यापेक्षा नक्कीच मोठी आहे. तो रोख पैसा भाजपाने कसा घेतला व त्याचा कशासाठी वापर केला हे जनतेला जाणून घ्यायचा अधिकार आहे. ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली केलेल्या वसुली प्रकरणी सोमय्या यांच्याबरोबर भाजपाचीही चौकशी करुन कडक कारवाई झाली पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.