“जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 05:33 PM2024-06-28T17:33:28+5:302024-06-28T17:33:48+5:30

Congress Nana Patole Reaction On Maharashtra Budget 2024: आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने घोषणांचा सरकाराने पाऊस पाडला आहे. जनता भूलथापांना बळी पडणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

congress nana patole reaction on maharashtra budget 2024 | “जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प”: नाना पटोले

“जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प”: नाना पटोले

Congress Nana Patole Reaction On Maharashtra Budget 2024: राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पाहात बसला आहे. पण मुंबईतील विधिमंडळात मात्र घोषणांचा पाऊस पडला आहे. अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी देणार याचा यात उल्लेख नाही. कृषी, पाटबंधारे, सामाजिक न्याय, गृहनिर्माण अशी विभागवार निधीची तरतूद नसणारा राज्याच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी कितपत होईल याबाबत शंका असून राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधारी महायुतीने स्वागत केले असून, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रावर ७ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे, दरडोई उत्पन्नात राज्य सहाव्या क्रमांकावर आहे. दरडोई उत्पन्न व निर्यातीच्या बाबतीत गुजरातच्या नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. राज्याची अशी दयनीय परिस्थिती असताना महायुती सरकार जनतेला गुलाबी स्वप्ने दाखवत आहे.

गॅस, पेट्रोल व डिझेलच्या करातून १० वर्षे जनतेला लुटले

गॅस, पेट्रोल व डिझेलच्या करातून १० वर्षे जनतेला लुटले आणि निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेलवरील कर कपातीचे गाजर दाखवले आहे. निवडणुकीच्या तोंडावर फक्त घोषणांचा पाऊस आहे अंमलबजावणी शून्य असणार आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीचा दारुण पराभव केल्याने चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने घोषणांचा पाऊस पाडला आहे, पण जनता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा दावा नाना पटोले यांनी केला. 

शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याची सरकारची घोषणा फसवी

शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याची सरकारची घोषणा फसवी आहे. शेतकऱ्यांच्या थकीत विज बिलाबाबत यात काहीही स्पष्टता नाही. तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षांनीही केली होती पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली. या अर्थसंकल्पात नोकर भरतीचा उल्लेख नाही, राज्य सरकारच्या विविध विभागात हजारो रिक्त पदे आहेत पण सरकार ती भरत नाही, एमपीएससीच्या माध्यमातून केली जाणारी पद भरती सुद्धा केली जात नाही. केवळ ऑनलाईन भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केली जात आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणी केली असली तरी महागाईत १५०० रुपयाने काय होणार आहे. काँग्रेस पक्षाच्या न्यायपत्रात महिलांना ८५०० रुपये देण्याचे आश्वासन होते त्याची कॉपी अजित पवार यांनी केली पण त्यांना नक्कलही करता आली नाही. केवळ १५०० रुपये जाहीर करुन ७००० रुपयाचे कमिशन सरकार खिशात घालणार आहे असे यातून दिसते कारण हे सरकारच ६० टक्के कमीशनवाले आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी अर्थसंकल्पावर निशाणा साधला.
 

Web Title: congress nana patole reaction on maharashtra budget 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.