“महागाईच्या काळात ५ लाख अत्यल्प, इर्शाळवाडी दुर्घटनेत १० लाखांची मदत द्यावी”: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 04:45 PM2023-07-21T16:45:15+5:302023-07-21T16:45:51+5:30
Maharashtra Monsoon Session 2023: प्रगत महाराष्ट्रात मुंबई, ठाण्याजवळ असलेल्या गावात लाइट नाही, रस्ता नाही, यंत्रणा पोहोचू शकत नाही, ही गंभीर बाब आहे, असे नाना पटोले म्हणाले.
Maharashtra Monsoon Session 2023: इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवदेन केले. घटनेबाबतची सविस्तर माहिती सभागृहाला दिली. बचावकार्य करणाऱ्यांचे कौतुक करत दुर्घटनाग्रस्त लोकांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. यानंतर यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकूणच महागाई पाहता ५ लाखांची मदत अत्यल्प असून, १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली.
नाना पटोले म्हणाले की, माधव समितीचा उल्लेख करण्यात आला. पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. या सगळ्या व्यवस्था अद्ययावत आणि चांगल्या करण्याचे काम का हाती घेतले जात नाहीत, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली. तसेच निसर्ग हा मोठा आहे. त्यासमोर माणूस हतबल आहे. मात्र, अशा आपत्तींची पूर्वतयारी करण्याचे काम माणसाच्या हातात आहे. माधव गाडगीळ समितीच्या शिफारसीच्या आधारावर सगळ्या व्यवस्था उभ्या करण्याची भूमिका सरकारने घ्यायला हवी, असे नाना पटोले यांनी सांगितले.
प्रगत महाराष्ट्रासाठी गावात लाइट, रस्ता नसणे गंभीर बाब
निसर्गाची छेडखानी होणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी. आम्ही सगळे सरकारसोबत आहोत. याबाबतीत राजकारण करण्याचे काम नाही. प्रगत महाराष्ट्रात मुंबई, ठाण्याजवळ असलेल्या या गावांमध्ये लाइट नाही, रस्ता नाही, यंत्रणा पोहोचू शकत नाही, ही गंभीर बाब आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. तसेच इर्शाळवाडी घटनास्थळी जाऊन आलो. रेल्वेचे काम सुरू आहे. स्फोटके लावली जातात, अशी माहिती तिथे दिली. हे एक कारण या घटनेला जबाबदार आहे का, अशी शंका उपस्थित करण्यात आली. विकासाच्या नावाखाली अशा घटना होणे योग्य नाही, अशा भावना आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत
या घटनेच्या दुसऱ्या दिवशीही तेथे भरपूर पाऊस सुरू आहे. मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. पुनर्वसन करताना एकट्या इर्शाळवाडीचे पुनर्वसन करुन चालणार नाही तर त्या भागातील धोकादायक सर्व गावांचे पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, एक मुलगा मासेमारी करायला गेला होता म्हणून बचावला. तेथील काही वाचलेल्या मुलांनी रात्री ९.३० वाजता अशी घटना आपल्या गावात होऊ शकते का, अशी भीती व्यक्त केली होती आणि लगेच अवघ्या काही तासांत तसेच झाले. ही परिस्थिती भयावह आहे, असे नाना पटोले यांनी नमूद केले.