“काँग्रेस पक्ष स्वाभिमान राखणार, महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम होऊ देणार नाही”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 05:50 PM2024-07-19T17:50:11+5:302024-07-19T17:50:54+5:30

Congress Nana Patole News: २० ऑगस्टला विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

congress nana patole said congress party will maintain self respect of maharashtra and criticized mahayuti govt | “काँग्रेस पक्ष स्वाभिमान राखणार, महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम होऊ देणार नाही”: नाना पटोले

“काँग्रेस पक्ष स्वाभिमान राखणार, महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम होऊ देणार नाही”: नाना पटोले

Congress Nana Patole News: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के.सी.वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना या बैठकीबाबत माहिती दिली. काँग्रेस पक्ष संविधान लोकशाही व महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणाची लढाई करणार आहे. आम्ही महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही. महाराष्ट्राची संपत्ती आणि मुंबई गुजरातला विकू देणार नाही. २० ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या महाभ्रष्ट युती सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हाच काँग्रेसचा संकल्प आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

महाविकास आघाडी एकत्र विधानसभा निवडणूक लढणार

विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार असून  आजच्या बैठकीत काँग्रेस संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुका व त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाचा सुपडा साफ झालेला आहे. जनतेला महाराष्ट्रातही परिवर्तन हवे आहे. महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करणार आहेत. आम्ही मिळून या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू, असा निर्धार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केला.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत आपल्याला त्याची माहिती मिळेल. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार असे के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: congress nana patole said congress party will maintain self respect of maharashtra and criticized mahayuti govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.