“देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 05:30 PM2022-01-30T17:30:10+5:302022-01-30T17:30:48+5:30

स्वातंत्र्याच्या लढाईप्रमाणे गांधी विचाराची लढाई सुरु ठेवा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.

congress nana patole said country will run not with the idea of hindutva but with ideology of mahatma gandhi | “देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल”: नाना पटोले

“देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल”: नाना पटोले

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे नावाच्या आतंकवाद्याने हत्या केली. महात्मा गांधी संपले असे हिंदुत्ववादी व्यवस्थेला वाटत असेल पण महात्मा गांधी आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहेत व त्यांचे विचार भविष्यातही जिवंत राहतील. गांधी विचार देशाने तसेच जगाने स्विकारलेला आहे तो कधीही संपणारा नाही. हा देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचारानेच चालेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

गांधी पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे गांधींना आदरांजली वाहण्यात आली, यावेळी भजन गायनही झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राष्ट्रीय किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष श्याम पांडे, प्रदेश काँग्रेसचे संघटन सरचिटणीस देवानंद पवार, सरचिटणीस राजेश शर्मा, राजन भोसले, मुनाफ हकीम, यशवंत हाप्पे, सरचिटणीस व प्रवक्त्या भावना जैन, प्रवक्ते अरुण सावंत, भरतसिंह आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, खा. राहुल गांधी यांनी गांधी पुण्यतिथीनिमित्त केलेले ट्विट योग्यच आहे. गांधी विचारांना संपवण्याचा अनेकदा प्रयत्न केला गेला पण गांधी विचार या देशात रुजलेला आहे. हाच विचार आजच्या पिढीत रुजवण्याचा आपण संकल्प करुयात. या देशाला गांधींजीनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजींची अहिंसेची शिकवण जगाने स्विकारलेली आहे. गांधी एक व्यक्ती नसून तो विचार आहे तो विचारच देशाला तारणारा आहे. ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केल्यानंतर मिळालेले हे स्वातंत्र्य आज धोक्यात आल्याची परिस्थिती देशात निर्माण झाली आहे त्यामुळे स्वातंत्र व संविधान अबाधित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.

महात्मा गांधी यांच्याबद्दल खोटा इतिहास सांगून त्यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा अपप्रचार थोपवण्यासाठी सजग रहा, सतर्क रहा. स्वातंत्र्याच्या लढाईप्रमाणे गांधी विचाराची लढाई सुरु ठेवा, असे आवाहनही पटोले यांनी केले.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या आत्मक्लेशाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पटोले म्हणाले की, खासदार अमोल कोल्हे हे डॉक्टर आहेत. कलाकार म्हणून त्यांनी कोणती भूमिका करावी हे त्यांचे स्वातंत्र्य आहे पण त्यांच्यासमोर जेव्हा नथुराम गोडसेच्या भूमिकेची स्क्रिप्ट आली त्यावेळीच त्यांना समजायला हवे होते. नथुरामला नायक दाखवून महात्मा गांधींना खलनायक ठरवण्याचा जो  प्रयत्न सुरु आहे तो मात्र आम्ही कदापी खपवून घेणार नाही म्हणूनच Why I Killed Gandhi? हा चित्रपट कोठेही प्रदर्शित होऊ नये अशी आम्ही मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्याकडे मागणी केली आहे.
 

Web Title: congress nana patole said country will run not with the idea of hindutva but with ideology of mahatma gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.