“मविआला ४२ जागांवर विजय मिळेल, भाजपा पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचेल”; काँग्रेसचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 05:29 PM2024-02-22T17:29:20+5:302024-02-22T17:32:03+5:30

Congress Nana Patole News: देशात परिवर्तनाचे वारे आहेत. भाजपाच्या सरकारविरोधात प्रचंड चीड आहे. काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे, असा दावा करण्यात आला आहे.

congress nana patole said maha vikas aghadi will win 42 seats maharashtra will lay the foundation for bjp defeat | “मविआला ४२ जागांवर विजय मिळेल, भाजपा पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचेल”; काँग्रेसचा निर्धार

“मविआला ४२ जागांवर विजय मिळेल, भाजपा पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचेल”; काँग्रेसचा निर्धार

Congress Nana Patole News: लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसची तयारी झाली असून मित्रपक्षांबरोबरचे जागा वाटप, संघटनेची तयारी, प्रचारातील मुद्दे यांवर राज्य निवड मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, शेकाप, माकपा, वंचित बहुजन आघाडीसह एकत्रितपणे निवडणुक लढवण्याची तयारी आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना असून मविआ लोकसभेच्या ४२ जागांवर विजय संपादन करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.  

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, बैठकीत जवळपास अडीच तास सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची संघटनात्मक ताकद आहे, त्या मतदारसंघात त्या पक्षाचा उमेदवार असेल,जागा वाटप हे मेरिटनुसारच होणार आहे, त्यात कोणतेही मतभेद नाहीत. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी अनुकुल असून  परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. शेतकरीविरोधी, तरुणांचा अपेक्षाभंग करणारे, महागाई, बेरोजगारी नियंत्रित करु न शकलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात जनतेत प्रचंड चीड आहे, अशी टीका करत, काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

भाजपा पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचणार

महाविकास आघाडी मजबूत असून केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचणार आहे.  
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदींचे हुकुमशाही सरकार शेतकऱ्यांना शत्रू, आतंकवादी समजून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करत आहेत. दिल्लीच्या खनौरी सीमेवर पोलिसांच्या गोळीबारात एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून तीन ते चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. देशाच्या पंतप्रधानाने संसदेत शेतकऱ्यांना खलिस्तानी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून अपमान केला. शेतकरी विरोधी, निर्दयी मोदी सरकारचा काँग्रेस पक्ष तीव्र धिक्कार करत आहे. भाजपा सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.   

दरम्यान, निवडणुका आल्यामुळे विरोधी पक्षांच्या लोकांवर सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकल्या जात आहेत. परंतु भाजपाच्या एकाही भ्रष्ट नेत्यावर कारवाई केली जात नाही. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची वल्गना भारतीय जनता पक्षाने केली होती. परंतु ज्या लोकांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भाजपात घेऊन भ्रष्टाचारयुक्त भाजपा केला आहे. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटळ्याचा आरोप केला त्यांच्यावर छापे टाकले का? उलट त्यांना सत्तेत घेऊन उपमुख्यमंत्री केले. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेत केला व त्यानंतर अशोक चव्हाणांना भाजपात घेऊन राज्यसभा खासदार केले. भाजपाने भ्रष्टाचारी लोकांनी सुरक्षाकवच दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ३०३ खासदारांमध्ये विरोधी पक्षातातील ज्या १६५ जण आहेत तर काँग्रेसचे ६७ जण आहेत, ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे काय भ्रष्टाचारमुक्त भारत करणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

 

Web Title: congress nana patole said maha vikas aghadi will win 42 seats maharashtra will lay the foundation for bjp defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.