“विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, शंखनाद सभा घेणार”: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 08:59 PM2024-07-05T20:59:39+5:302024-07-05T21:02:06+5:30
Congress Nana Patole News: महाविकास आघाडीची मुंबईत एक मोठी सभा होणार असून, विधानसभेचे जागावाटपही लवकरच होईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
Congress Nana Patole News: विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणे अटळ आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुती यांपैकी कोणीही माघार घेतलेली नाही. विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. मात्र, त्या प्रयत्नांना यश आले नाही. यानंतर आता विधान परिषद निवडणुकीत आमचे तीनही उमेदवार निवडून येतील, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर शिंदे गटाकडून भावना गवळी, कृपाल तुमाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर, शेकाप नेते जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापैकी कुणीही अर्ज मागे न घेतल्यामुळे आता निवडणूक अटळ असल्याचे सांगितले जात आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील
विधानसभा पूर्व तयारीची बैठक आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षातील नेत्यांना बोलावून एक सभा मुंबईत घेणार आहोत. त्याची अजून तारीख ठरलेली नाही. मविआच्या सर्व नेत्यांना बोलवून एक सभा मुंबईत घेणार व तिकडून शंखनाद करणार आहोत. तसेच विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. घोडेबाजार करणारेच घोडेबाजारावर बोलत आहेत. भ्रष्टाचार केला आणि त्याच पैशांनी घोडेबाजार केला, असा आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच विधानसभेचे जागावाटप लवकरच होईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, लवकरच मविआ जनतेचे आभार मानण्यासाठी संयुक्त मेळावा घेणार आहे. तीन पक्षांची प्राथमिक औपचारिक बैठक झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. लवकरच संयुक्त मेळावा मविआ घेणार आहे आणि जनतेचे आभार मानणार आहे. जिल्हा पातळीवर तिन्ही पक्षाने एकत्र आणले जाईल. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. लवकरच प्रचाराचे मुद्दे ठरवले जातील, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.