Maharashtra Politics: “पंतप्रधान मोदी विदर्भात येऊनही शेतकऱ्यांबद्दल शब्दही का बोलले नाहीत?”; काँग्रेसची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 08:14 PM2022-12-12T20:14:12+5:302022-12-12T20:15:06+5:30

Maharashtra News: पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एकही आश्वासन पूर्ण झाले नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

congress nana patole said pm modi not speak a single word on farmers issue in samruddhi mahamarg inauguration | Maharashtra Politics: “पंतप्रधान मोदी विदर्भात येऊनही शेतकऱ्यांबद्दल शब्दही का बोलले नाहीत?”; काँग्रेसची विचारणा

Maharashtra Politics: “पंतप्रधान मोदी विदर्भात येऊनही शेतकऱ्यांबद्दल शब्दही का बोलले नाहीत?”; काँग्रेसची विचारणा

Next

Maharashtra Politics: २०१४ च्या निवडणुकीआधी नरेंद्र मोदी विदर्भात येऊन चाय पे चर्चा करत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन गेले. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासनही दिले होते पण यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले ज्या विदर्भात शेतकरी आत्महत्येची मोठी समस्या आहे त्याबद्दल पंतप्रधान एक शब्दही बोलले नाहीत. समृद्धी महामार्गामुळे कोणाची समृद्धी झाली, हे सर्वांना माहित आहे पण शेतकऱ्याची समृद्धी झालेली नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने चार महिन्यातच राज्याचा नावलौकिक रसातळाला मिळवला असून महापुरुषांचा अपमान सातत्याने केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करुनही भाजपा नेत्यांवर कारवाई होत नाही. महापुरुषांच्या अपमानाबद्दल जनतेत तीव्र संताप आहे पण सत्ताधारी मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करत आहेत. भाजपाच्या विखारी प्रचाराविरोधात एकत्रपणे लढले पाहिजे म्हणूनच महापुरुषांच्या अपमानासह राज्यातील विविध समस्याप्रश्नी महाविकास आघाडी १७ तारखेला मुंबईत महामोर्चा काढून मस्तवाल सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले. 

सत्ताधाऱ्यांच्या मस्तवालपणा विरोधात मुंबईत १७ तारखेला महाविकास आघाडीचा महामोर्चा!

गांधी भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या  बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष महापुरुषांचे विचार पुसून टाकण्याचे काम करत असून त्यातूनच महापुरुषांचा सातत्याने अपमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्यात राज्यपालांसह भाजपात चढाओढच लागलेली दिसते. हे अनवधानाने झालेले नाही तरल जाणीवपूर्वक केले जात आहे. जनतेत या अपमानाबद्दल प्रचंड रोष आहे, कारवाई करण्याची मागणी केली जात आहे परंतु भाजपा या वाचाळवीरांवर कारवाई न करता त्यांचा निषेध करणाऱ्यांवर कारवाई करत आहे. शाईफेक चुकीचीच आहे, त्याचा आम्ही निषेध करतो पण पत्रकारावर ३०७, ३५३ चे गंभीर कलमे लावून गुन्हा दाखल केला तो कशाच्या आधारावर? पोलिसांचे निलंबन कशासाठी? या पोलिसांचे निलंबन तात्काळ मागे घेतले पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. 

गृहमंत्र्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे

राज्यातील सत्ताधारी पक्षाचे मंत्री व आमदार राजरोसपणे धमक्या देत आहेत पण राज्य सरकार त्यांच्यावरही कारवाई करत नाही. चंद्रकांत पाटील यांनी बाळशास्त्री जांभेकर यांनाही एकेरी भाषा वापरली, मलाही एकेरी भाषा वापरली. तर सत्ताधारी पक्षाचा एक आमदार गावकऱ्यांना खुलेआमपणे धमकावतो. विरोधकांची सुरक्षा काढून घेतली जाते आणि सत्ताधारी पक्षाच्या ५० आमदारंना, त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षा पुरवते, या सुरक्षेसाठी निर्भया फंडातील गाड्या पुरवल्या जात आहेत. राज्यातील जनतेची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. राज्यात कायद्याचे राज्य राहिले का? असे चित्र महाराष्ट्रात सध्या आहे. गृहमंत्र्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे, ही मागणीही नाना पटोले यांनी केली. 

दरम्यान, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन अनेक वर्षांच्या कालखंडानंतर होत आहे. हे अधिवेशन किमान तीन आठवड्यांचे असावे अशी काँग्रेसची मागणी आहे. मंगळवारच्या बैठकीत काँग्रेस तशी ही मागणी करणार आहे. विदर्भातील समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन जास्त काळ चालले पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे. या अधिवेशनात राजभवनमधील कारभाराची पोलखोल करणार असल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: congress nana patole said pm modi not speak a single word on farmers issue in samruddhi mahamarg inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.