“पहिल्याच पावसात सरकारचे पितळ उघडे पडले, अपयशाचे खापर पावसावर फोडू नये”; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 04:46 PM2024-07-08T16:46:38+5:302024-07-08T16:47:19+5:30

Congress Nana Patole News: राजकारणापेक्षा मुंबईच्या कामात जास्त लक्ष घातले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, अशी टीका नाना पटोलेंनी केली.

congress nana patole slams mahayuti govt over people faced problems heavy rain in state including mumbai | “पहिल्याच पावसात सरकारचे पितळ उघडे पडले, अपयशाचे खापर पावसावर फोडू नये”; नाना पटोलेंची टीका

“पहिल्याच पावसात सरकारचे पितळ उघडे पडले, अपयशाचे खापर पावसावर फोडू नये”; नाना पटोलेंची टीका

Congress Nana Patole News: मुंबई व उपनगरातील परिस्थिती पहिल्याच पावसाने अत्यंत भयावह झाली आहे. मुंबई व उपनगरातील अनेक भाग पाण्याने तुडुंब भरले, रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प होऊन मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. महानगरपालिका व रेल्वे प्रशासन यांच्यात कसलाही समन्वय नाही तर दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांना शिंदे सरकारच्या पापाची फळे भोगावी लागत आहे. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाते हे अत्यंत गंभीर आहे.  पावसाने शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे पितळ उघडे पाडले असून महाभ्रष्टयुती सरकारने, चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की,  मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्री आहेत पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सुत्रे असल्याने मुंबई व महाराष्ट्राला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. महापालिकेच्या कार्यालयात दोन पालकमंत्र्यांची कार्यालये मुंबईकरांच्या कष्टाचे पैसे खाण्यासाठी काढली आहेत का? असा संतप्त सवाल विचारून स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत आहेत. मुंबईत झालेला पाऊस हा काही पहिल्यांदाच झालेला नाही. यापेक्षा मोठा पाऊस मुंबईत झालेला आहे पण आजच्या सारखी बिकट परिस्थिती झाली नव्हती. राजकारणापेक्षा मुंबईच्या कामात जास्त लक्ष घातले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, या शब्दांत नाना पटोले यांनी निशाणा साधला.

इव्हेंटबाजीचा पर्दाफाश झाला आहे

मुंबईत कोट्यवधी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधले पण त्यात खड्डे आहेत. कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली, अटल सेतूला भेग्या पडल्या, हा महायुतीचा विकास आहे का? महापालिकेने मान्सूनपूर्व कामे केली, नालेसफाई केली असा सरकारचा दावा आहे तो या पावसाने खोटा ठरवला. मुख्यमंत्री ग्रीन कार्पेटवर उभा राहून नालेसफाईच्या पाहणीचे बिभत्स प्रदर्शन करत होते. त्यांच्या इव्हेंटबाजीचा पर्दाफाश झाला आहे.  नालेसफाईत सुद्धा हातसफाई करुन खिसे भरण्याचेच काम झाले म्हणून मुंबई तुंबली. एकाच पावसात विधिमंडळाचे अधिवेशन दिवसभरासाठी तहकूब करावे लागले हे या सरकारचा गलथानपणा व निष्काळजीपणाचे उदाहरण आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मुंबईत पावसाने जनजीवन ठप्प केले असताना राज्याच्या अनेक भागात मात्र अद्याप हजेरी लावलेली नाही. अनेक भागात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर ओढवले आहे. पाणीटंचाईची अवस्था अत्यंत भयंकर आहे. अनेक गावांत पाण्यासाठी माता भगिणींना पाच पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. टँकरमाफिया आणि सरकारी अधिकारी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. जनावरांच्या चा-याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सरकार फक्त मंत्रालयातून आदेश देते पण प्रशासन खाली काहीच काम करत नाही, याकडे राज्य सरकार कधी लक्ष देणार, असे नाना पटोले म्हणाले.  
 

Web Title: congress nana patole slams mahayuti govt over people faced problems heavy rain in state including mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.