काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुप्त खलबते, ज्येष्ठ नेते दिल्लीत; बैठकीवर शिवसेनेचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:34 AM2019-11-01T01:34:49+5:302019-11-01T06:33:46+5:30

शिवसेनेने पाच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यावे, त्यांच्या मनात काय आहे याचा प्रस्ताव द्यावा, त्यानंतर आम्ही दिल्लीत चर्चा करून निर्णय घेऊ, असे बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’ला निवडणुकानंतर लगेचच सांगितले होते.

Congress-NCP leaders secret secret, senior leaders in Delhi; Shiv Sena's focus on the meeting | काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुप्त खलबते, ज्येष्ठ नेते दिल्लीत; बैठकीवर शिवसेनेचे लक्ष

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुप्त खलबते, ज्येष्ठ नेते दिल्लीत; बैठकीवर शिवसेनेचे लक्ष

Next

अतुल कुलकर्णी 

मुंबई : भाजप व शिवसेनेतील वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक गुरुवारी खा. शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व प्रभारी मल्लिकार्जुन खरगे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. मात्र ही भेट उद्या होईल, असे समजते.

शिवसेनेने पाच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यावे, त्यांच्या मनात काय आहे याचा प्रस्ताव द्यावा, त्यानंतर आम्ही दिल्लीत चर्चा करून निर्णय घेऊ, असे बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’ला निवडणुकानंतर लगेचच सांगितले होते. तोच मुद्दा पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला होता. शिवसेनेने प्रस्ताव दिला का याविषयी कोणी बोलायला तयार नाही, मात्र तसे असल्यानेच नेते तातडीने दिल्लीला गेले असावेत, असे काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. कोणालाच बहुमत नसल्याने राजकीय जुळवाजुळव करण्यात काही अयोग्य नाही, असे तो म्हणाला.

शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांना तुम्ही तुमचे काय ते ठरवा, तुमची भूमिका ठरली की आम्ही आमचा निर्णय तात्काळ घेऊ, असे सांगितले, तर राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असे सूचक विधान अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीतील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे नेतेही काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत काय होते, यावर लक्ष ठेवून आहेत.

उपमुख्यमंत्रीपदाचा आनंदही नाही
शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ असे सांगणाऱ्या भाजपने त्यांच्याकडूनही एक उपमुख्यमंत्री असेल असे सांगितल्याने शिवसेना आणखी अस्वस्थ आहे. आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री झाले तर भाजपकडून चंद्रकांत पाटील उपमुख्यमंत्री होतील. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार पुन्हा शिवसेना कागदोपत्री आणि सगळीकडेच तीन नंबरवर राहील, अशी खेळी भाजपने खेळल्याची चर्चा शिवसेनेत आहे.

काँग्रेसच्या नेतेपदी चव्हाण?
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नियुक्ती जवळपास निश्चित आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीच हे पद अशोक चव्हाण वा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घ्यावे असे सुचवले होते. अशोक चव्हाण निवड दिल्लीतून जाहीर केली जाईल असे समजते. गटनेतेपदी यशोमती ठाकूर यांच्यासह अन्य नावांची चर्चा आहे. पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी आमदारांशी चर्चा केली. मात्र नेत्याचे नाव दिल्लीतून जाहीर करू, अशा सूचना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कार्यालयाने खरगे यांना केल्याचे समजते.

 

Web Title: Congress-NCP leaders secret secret, senior leaders in Delhi; Shiv Sena's focus on the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.