“मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचा चेहरा हसरा होता, महाविकास आघाडीला धोका नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 04:43 PM2022-06-22T16:43:33+5:302022-06-22T16:44:36+5:30

मंत्रिमंडळ बैठकीला उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली.

congress nitin raut said cm uddhav thackeray laughing in cabinet meeting means no danger to maha vikas aghadi govt | “मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचा चेहरा हसरा होता, महाविकास आघाडीला धोका नाही”

“मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचा चेहरा हसरा होता, महाविकास आघाडीला धोका नाही”

Next

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. शिवसेनेने परत येण्यासाठी अल्टिमेटम दिलेले आहे. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. उलटपक्षी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढत असून, शिवसेनेतील आणखी काही आमदार गुवाहाटीला गेल्याचे समजते. या सर्व राजकीय धामधुमीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.

मंत्रिमंडळाच्या या बैठकीला शिवसेनेचे अगदी काही मोजकेच मंत्री उपस्थित होते, असे सांगितले जात आहे. यातच काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितिन राऊत (Nitin Raut) हे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चेहरा हसरा होता. याचाच अर्थ महाविकास आघाडीच्या सरकारला धोका नाही. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत विधानसभा बरखास्त करण्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. शिवसेनेतील मोठ्या बंडाळीनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सतर्क झाले आहे. आपले आमदार फुटले नाही ना, याची खात्री करून घेताना दिसत आहेत. तसेच आता त्यांना हॉटेलवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितेल जात आहे. 

...तोपर्यंत भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही

काही झाले तरी आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. भाजपसोबत जाण्याचा प्रश्न नाही, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. शरद पवार यांनी आमदारांशी चर्चा करून त्यांचे अभिप्राय विचारले, मनातील भावना जाणून घेतल्या असेही ते म्हणाले. गुजर जायेगा ये दौर भी, जरा सा इत्मिनाना तो रख.. जब खुशियाँ ही नही ठहरी, तो गम की क्या औकात हैं.. असा शेर अमोल मिटकरी यांनी ट्विट केला होता. याविषयी बोलताना, आताच्या घडीला राज्यावर आणि महाविकास आघाडी सरकारवर संकट आहे. शिवसेनेच्या बंडखोरांना भाजप रसद पुरवत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दिल्लीतून हे सगळे फंडिंग होत आहे, असेही सांगितले जात आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी जोपर्यंत शरद पवार मैदानात आहेत, तोपर्यंत भाजपचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. 
 

Web Title: congress nitin raut said cm uddhav thackeray laughing in cabinet meeting means no danger to maha vikas aghadi govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.