Congress: प्रसंगी विरोधी पक्षात बसू, पण मध्यावधी निवडणुका नकोच! काँग्रेसच्या आमदारांची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 11:37 AM2022-06-23T11:37:35+5:302022-06-23T11:39:55+5:30
Congress: मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची तयारी नाही. प्रसंगी आम्ही विरोधी पक्षात बसण्यास तयार आहोत, अशी भावना काँग्रेसच्या राज्यातील आमदारांनी पक्षाचे निरीक्षक व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासमोर मांडली.
मुंबई : विधानसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची तयारी नाही. प्रसंगी आम्ही विरोधी पक्षात बसण्यास तयार आहोत, अशी भावना काँग्रेसच्या राज्यातील आमदारांनी पक्षाचे निरीक्षक व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासमोर मांडली.
कमलनाथ यांना पक्षश्रेष्ठींनी राज्यात कालपासून सुरू झालेल्या जोरदार राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाठविले आहे. त्यांनी आधी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस मंत्र्यांबरोबर थोरात यांच्या रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली आणि नंतर आमदारांच्या भावनाही जाणून घेतल्या.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळीच ट्विट केले होते, की विधानसभा बरखास्तीकडे जात आहे. त्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभा बरखास्तीची शिफारस राज्यपालांकडे करू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरु झाली. त्यानंतर थोड्याच वेळात झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत कमलनाथ यांनी आमदारांची याबाबत मते जाणून घेतली.
यावेळी पक्षाच्या आमदारांनी कमलनाथ यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, की विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याची आज आमची तयारी नाही. आताच कोरोनाचे संकट दूर झाले आहे. मतदारसंघांमधील विकासाच्या कामांना गती देता आलेली नाही. त्यामुळे लगेच निवडणुकीला तोंड देणे शक्य नाही.
कमलनाथ : सरकारला पाठिंबा; शरद पवारांशी चर्चा
nकाँग्रेस महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या वृत्ताचा पक्षाचे निरीक्षक कमलनाथ यांनी इन्कार केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की काँग्रेसचा महाविकास आघाडी सरकारला पूर्ण पाठिंबा आहे. मी शरद पवार यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनीदेखील हीच भूमिका स्पष्ट केली.
nशिवसेनेच्या आमदारांची फोडाफोडी करणे हे भाजपचे कारस्थान आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसबाबत त्यांनी तसेच केले होते. शिवसेनेचे आमदार हे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहेत, ते गद्दारी करणार नाहीत, असा माझा विश्वास आहे.