काँग्रेस पक्ष एकसंध, आमच्यात कुठलाही वाद नाही; थोरातांच्या नाराजीवर पटोलेंचं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 07:09 PM2023-02-15T19:09:39+5:302023-02-15T19:10:07+5:30
भारत जोडो यात्रेमुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. अमरावती व नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे असं पटोले म्हणाले.
मुंबई - विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व आपल्यामध्ये कोणतेही वाद नाहीत आम्ही एकत्रच आहोत. मात्र नागपूर व अमरावतीतील पराभवाकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी भाजपाने आमच्यात मतभेद असल्याचे वातावरण निर्माण केले आणि माध्यमांनी त्याला हवा दिली असं भाष्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या हुकूमाशाही कारभाराला देश कंटाळला आहे. भाजपा व मोदी कोणतेचे नियम कायदे पाळत नाही. खा. राहुल गांधी व राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या संसदेतील भाषण वगळण्यात आले आहे. राहूल गांधी यांनी मोदी व अदानी यांच्या संबंधाबद्दल प्रश्न विचारला होता पण मोदी सरकारने मनमानी पदधतीने त्यांचे भाषण कामकाजातून वगळून संसदेतच लोकशाहीचा खून केला. मोदी सराकरमध्ये शेतकरी, तरुण, छोटे व्यापारी, पत्रकार, प्रसार माध्यमांवर अत्याचार केले जात आहेत, त्यांना देशोधडीला लावले जात आहे. हाथ से हाथ जोडो अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जावा आणि भाजपा व मोदी सरकारच्या पापाचा पाढा वाचून दाखवा असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत भारत जोडो यात्रा यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात सुरु करण्यात आले असून घरोघरो जावून राहुल गांधींचा संदेश पोहचवा. भारत जोडो यात्रेमुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. अमरावती व नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही मविआचेच उमेदवार विजयी होतील. भाजपाच्या कारभाराला जनता कंटाळली असून त्यांचा पराभव करण्यासाठी आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा संकल्प करा असं आवाहन प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी कार्यकर्त्यांना केले.
देश, लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम काँग्रेसच करु शकतो
तर विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, भारत जोडो यात्रेची दखल जगाने घेतलेली आहे, एवढी मोठी पदयात्रा जगाच्या पाठीवार आजपर्यंत झालेली नाही. ही यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले व त्याचे कौतुक देशभर झाले. भारत जोडो यात्रेने जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे काम केले. भाजपाचा कारभार पाहता देशात लोकशाही, संविधान राहिल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण भारत जोडो यात्रेने जनतेच्या आशा काँग्रेसकडून वाढल्या आहेत. देश, लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम काँग्रेसच करु शकतो. काँग्रेस पक्षच आता आशेचा किरण आहे हा विश्वास वाढला आहे असं त्यांनी सांगितले.