निर्मला सीतारामन यांच्याविरोधात काँग्रेसची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 04:50 AM2021-02-08T04:50:56+5:302021-02-08T04:51:24+5:30

आंदोलनासाठी जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकार तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Congress protests against Nirmala Sitharaman | निर्मला सीतारामन यांच्याविरोधात काँग्रेसची निदर्शने

निर्मला सीतारामन यांच्याविरोधात काँग्रेसची निदर्शने

Next

मुंबई : महागाई, इंधनाच्या वाढत्या दरांविरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने दादर स्थानकाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अर्थसंकल्प केवळ चारपाच उद्योगपतींच्या हिताचा असून गरीब जनतेला त्याचा काहीच फायदा नसल्याचा आरोप मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी यावेळी केला.

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीविरोधातील निदर्शनांसाठी सकाळपासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे दादर स्थानकाजवळच योगी सभागृहात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्पावरील कार्यक्रम मुंबई भाजपने आयोजित केला होता. त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला होता. आंदोलनासाठी जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकार तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दादर स्थानकाजवळ लावलेले भाजपच्या कार्यक्रमाचे बॅनर अनधिकृत असल्याचे सांगत ती हटवण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. अर्थमंत्री आज मुंबईत काही उद्योजक, धनाढ्य लोकांना बजेट किती चांगले आहे, हे सांगण्यासाठी आले आहेत. त्यांनी आमच्या पाच सदस्यांच्या शिष्टमंडळालाही भेटावे आणि त्यांचे बजेट गरीब जनतेसाठी कसे व किती चांगले आहे, याचा खुलासा करावा, असे आव्हान भाई जगताप यांनी दिले.

तर, काँग्रेसने ६५ वर्षांत पेट्रोल ६५ रुपये ठेवले, परंतु भाजपने सहा वर्षांत ९४ रुपये करून टाकले.  लवकरच पेट्रोल १०० रुपये होणार आहे. आज घरगुती गॅस ८०० रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. हा गरीब जनतेवर अन्याय आहे. देशातील कष्टकरी, शेतकरी अन्नदाता काळे कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण भाजप सरकारला काहीच फरक पडत नाही, असे चरणसिंग सप्रा म्हणाले. 

दादर पूर्वेतील ‘राजगृह’ येथून दादर स्थानकापर्यंतच्या या मोर्चात जगताप यांच्यासह कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, 
नसीम खान, एकनाथ गायकवाड,  प्रवक्ते राजू वाघमारे यांच्यासह काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Congress protests against Nirmala Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.