इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:01 AM2018-04-05T05:01:54+5:302018-04-05T05:01:54+5:30
पेट्रोल, डिझेलच्या दरातील भरमसाठ दरवाढीविरोधात गुरुवारी मुंबई काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढण्यात येणार आहे. इंधन दरवाढ केल्याबद्दल भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स ते गिरगाव चौपाटी दरम्यान ही सायकल रॅली धावणार आहे.
मुंबई - पेट्रोल, डिझेलच्या दरातील भरमसाठ दरवाढीविरोधात गुरुवारी मुंबई काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढण्यात येणार आहे. इंधन दरवाढ केल्याबद्दल भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स ते गिरगाव चौपाटी दरम्यान ही सायकल रॅली धावणार आहे.
देशभरातील जनता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने त्रस्त आहे. त्यातच संपूर्ण भारतात मुंबई मध्ये सर्वात जास्त आहे. या इंधन दरवाढीविरोधात सरकारला जागे करण्यासाठी आणि पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोलियम पदार्थ जीएसटी मध्ये आणण्याच्या मागणीकरिता सरकारवर दबाव आणण्यासाठी आम्ही महालक्ष्मी रेसकोर्स ते गिरगाव चौपाटी भव्य सायकल मार्च काढणार आहोत, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर ८१ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर ६८ रुपये प्रति लीटर आहे. कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेत कमी असतानासुद्धा भरमसाठ कर लावून हा भाव वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. आज सर्व वस्तूंवर जीएसटी लावला जातो. फक्त पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी नाही. जीएसटी लागू झाल्यास नागरिकांना हा अनावश्यक कर द्यावा लागणार नाही. जे पेट्रोल आज ८१ रुपयांना मिळत आहेत, तेच ५० ते ५५ रुपये प्रति लीटरला मिळेल. त्यामुळे भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी हा सायकल मार्च काढण्यात येणार आहे. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या मार्चमध्ये सामील व्हावे आणि सरकारवर दबाव आणावा, असे आवाहनही संजय निरुपम यांनी केले.