“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 04:53 PM2024-05-07T16:53:09+5:302024-05-07T16:55:32+5:30
Congress Ramesh Chennithala: महाराष्ट्रातील सुज्ञ जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे.
Congress Ramesh Chennithala: शरद पवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला पंतप्रधान मोदी भटकती आत्मा म्हणतात. देशाच्या पंतप्रधानपद भूषवत असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचे वक्तव्य शोभा देते का? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पंतप्रधान मोदी आणि त्यांचे लोक नकली शिवसेना म्हणतात. पण मोदीजी तुम्ही हे विसरू नका की, हे शिवसैनिक कर्मठ शिवसैनिक आहेत. हे शिवसैनिक आणि इथली शिवसेना तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, या शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची हल्लाबोल केला.
मीडियाशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, त्यांच्याकडे दुसरे कोणते मुद्दे नाहीत, म्हणून ते फोडाफोडीचे आणि विभाजनाचे राजकारण करत आहेत. पण ते शरद पवारांबद्दल, शिवसेनेबद्दल कितीही बोलले. तरी फरक पडणार नाही कारण महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या सोबत आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचे आमचे लक्ष आहे. मुंबईमध्ये सहाच्या सहा जागा आम्ही जिकू, अशी मला पूर्ण खात्री आहे, असे चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा देत देशभर फिरत होते. पण मुळात २०० पार होणे सुद्धा त्यांना जड जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पाहता ही गोष्ट त्यांच्या सुद्धा लक्षात आली आहे. मोदी कार्ड महाराष्ट्रात चालेल, अशी अशा भाजपवाले बाळगून होते. पण ती पूर्णपणे फोल ठरलेली आहे. त्यामुळे मोदीजी आणि त्यांचे सहकारी हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान सारखे मुद्दे काढून देशामध्ये विभाजनाचे राजकारण करू पाहत आहेत. पण महाराष्ट्रातील सुज्ञ जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका चेन्नीथला यांनी केली.
दरम्यान, येथील भूमिपुत्र भूषण पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावे, असे आवाहन उत्तर मुंबईच्या जनतेला करत आहे. हे कोळी बांधव येथील मूळ भूमिपुत्र आहेत. कोळीबांधवांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात निवडणूक लढवायचा अधिकार नाही, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.