“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:01 PM2024-10-02T16:01:51+5:302024-10-02T16:02:43+5:30
Congress Ramesh Chennithala News: मते मिळवण्यासाठी भाजपा सरकारची शेवटची धडपड सुरु आहे. पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, त्यांना सर्व समजते, अशी टीका करण्यात आली आहे.
Congress Ramesh Chennithala News: धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार व गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता बंधुभाव जपावा. इराण व इस्राईलमध्ये जे सुरु आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशावेळी गाधींजींनी घालून दिलेला आदर्श व अहिंसेचा मार्गच महत्वाचा ठरतो, जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गांधींजींनी घालून दिलेल्या मागार्चा अवलंब करावा, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केले. तसेच चरक्यावर सुत कातले व भजन गायनही करण्यात आले. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसा मार्गाचे पालन करत नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांचे नाव सातत्याने घेत असतात पण ते गांधीजींचा आदर्श तसेच गांधीजींनी घालून दिलेला अहिंसेच्या मार्गाचे पालन करताना दिसत नाहीत. जातीच्या धर्माच्या नावावर लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम ते करत आहेत, हे देशाच्या हिताचे नाही. देशाच्या विकास व प्रगतीसाठी गांधी विचारच महत्वाचा आहे त्याचा अवलंब त्यांनी करावा, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याआधीच महाराष्ट्रात पराभव मान्य केला आहे. भाजपाची नीती वापरा आणि फेकून द्या, अशी आहे. तेच महाराष्ट्रात भाजपा मित्रपक्षांसोबत करत आहे. भाजपा सरकारचे शेवटचे दिवस उरले असल्याने सरकार धडाधड निर्णय घेत आहे. पण सरकारकडे पैसा नाही. निवडणूक होणार असल्याने त्याची अमंलबजावणी होणे कठीण आहे. मते मिळवण्यासाठी भाजपा सरकारची शेवटची धडपड सुरु आहे. पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांना सर्व समजते, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.