...तर आम्ही वेगळे बोलणे आवश्यक वाटत नाही, लेटरबॉम्बनंतर काँग्रेस मंत्र्यांनी मौन सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 01:05 PM2021-03-21T13:05:57+5:302021-03-21T13:06:54+5:30
परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप झाला असून तीन पक्षीय ठाकरे सरकारला हादरा बसला आहे. याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे.
मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी भाजप आक्रमक झाला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागणी भाजपा नेत्यांसह राज ठाकरे यांनी केली होती. तर, सरकारमधील मंत्री आणि नेतेमंडळी सावध भूमिका घेताना दिसत आहेत.
परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप झाला असून तीन पक्षीय ठाकरे सरकारला हादरा बसला आहे. याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. तर, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष्य केलंय. आता, काँग्रेसकडून अधिकृतपणे भूमिका मांडण्यात आलीय. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सावध पवित्रा घेत, ई-मेल बाबत शंका असल्याचं म्हटलंय.
परमबीर सिंग यांनी जे पत्र दिले, ते त्यांची बदली झाल्यानंतर दिले आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या सर्व विषयाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यक्तिशः लक्ष घालत आहेत. त्या पत्राच्या सत्यतेबाबत ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना शंका वाटत आहे. त्यावेळी आम्ही काही वेगळे बोलणे मला आवश्यक वाटत नाही, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर, बाळासाहेब थोरात यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणतात
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे ठाकरे सरकारदेखील अडचणीत सापडलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांनादेखील सरकारचा बचाव करणं अवघड होत असल्याचं दिसत आहे. 'अशा प्रकारचे गंभीर आरोप होणं मंत्र्यांसाठी, सरकारसाठी दुर्दैवी आहे. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत,' असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
संजय निरुपम यांची पवारांवर टीका
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. 'परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, त्यांचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत. तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का?', असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसनं या विषयात ठाम भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घ्यावा
परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांनी केलेले आरोप केवळ खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे फडणवीस म्हणाले.