वंचित बहुजन आघाडीच्या ऑफरची काँग्रेसकडून खिल्ली, गांभीर्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 08:50 PM2019-07-03T20:50:21+5:302019-07-03T20:59:11+5:30
मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचित सावंत यांनी ट्विट करुन वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव धुडकावला. काँग्रेसने ...
मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचित सावंत यांनी ट्विट करुन वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव धुडकावला. काँग्रेसने वंचितच्या ऑफरची खिल्ली उडवली आहे. वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ऑफरवरुन उत्तर देताना, काँग्रसने हे गमतीशीर असल्याचे म्हटलंय. वंचित बहुजन आघाडीने दिलेली 40 जागांची ऑफर म्हणजे अत्यंत गंमतीशीर आहे, असे ट्विट सावंत यांनी केले आहे. पण, गांभिर्याने विचार करावा, असेही सावंत यांनी म्हटले आहे.
देशात आणि राज्यात अभूतपूर्व अशा तऱ्हेचा धोका सामाजिक ऐक्याला व लोकशाहीला निर्माण झाला आहे. त्यामुळे पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. त्यासाठी काँग्रेस पक्ष गांभीर्याने प्रयत्न करत आहे. संविधानाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी करण्यासाठी काँग्रेस पक्ष ज्या गांभीर्याने विचार करत आहे, त्याच गांभिर्याने इतर पक्षांनीही विचार करावा अशी अपेक्षा असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या जागा देण्याच्या वक्तव्यावर काँग्रेसची भूमिका pic.twitter.com/8Oao51szhZ
— Sachin Sawant (@sachin_inc) July 3, 2019
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेस उत्सुक असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसलाच अल्टीमेटम दिला आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससमोरच प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेसकडून अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. सर्व काही बातम्यांमधून समजतंय. पण काँग्रेसला आम्ही 40 जागा द्यायला तयार आहोत, याबाबतचा निर्णय त्यांनी 10 दिवसांत कळवावा, असेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 288 जागा लढण्यासाठी सक्षम आहे, असे वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन निवडणुकी लढविण्यास इच्छुक असल्याच्या बातम्या माध्यमांत आल्या होत्या. तर, काँग्रेस नेतेही काही जागा देऊन वंचितला सोबत घेण्याची तयारी करत होते. मात्र, वंचितनेच काँग्रेससमोर प्रस्ताव ठेवला. त्यामुळे काँग्रेसनेही हा प्रस्ताव धुडकावून लावत हे अत्यंत गंमतशीर असल्याचं म्हटलंय.
दरम्यान, वंचिकडून काँग्रेसला 40 जागांची ऑफर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आगामी 10 दिवसात याबाबत काँग्रेसने निर्णय घ्याव, अन्यथा आम्ही 288 जागांवर निवडणूक लढवण्यास सक्षम असल्याचेही वंचितकडून सांगण्यात आले आहे. तर, काँग्रेसला कोणत्या 40 जागा हव्यात तेही सांगावं, असेही वंचितने म्हटले आहे.