"समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशप्रमाणेच जागा मिळणार"; विजय वडेट्टीवारांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:56 PM2024-10-17T15:56:18+5:302024-10-17T15:58:21+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १२ जागा मागणाऱ्या समाजवादी पक्षाला काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे.
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये बैठकांवर बैठका सुरू आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते आज पुन्हा जागा वाटपावर चर्चा करत आहेत. अशातच इंडिया आघाडीचा भाग असलेल्या समाजवादी पक्षानेही जागावाटपावरुन महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. समाजवादी पक्षाला महाराष्ट्रात भारत आघाडीकडून १२ जागा हव्या आहेत. तसेच जागावाटपासंदर्भात तीनच पक्षांमध्येच चर्चा होत आहे. छोट्या पक्षांसोबत बैठका होत नसल्याचेही आझमी यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये बैठका सुरू आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत बैठका सुरु आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ६२ जागांची मागणी केल्याचे म्हटलं जात आहे. तर २० तारखेला काँग्रेस उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करू शकतो. मात्र, काँग्रेस आपल्या मित्रपक्षांना किती जागा सोडणार हा मोठा प्रश्न आहे. समाजवादी पक्षही महाराष्ट्रात काँग्रेसकडे जागांची मागणी करत आहे. महाराष्ट्र सपाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी आम्हाला १२ जागा हव्या आहेत आणि त्यांनी त्या दिल्या नाहीत तर आम्ही निवडणूक लढवणार नाही असे होणार नाही, असं म्हटलं आहे. या सगळ्यात काँग्रेसकडून समाजवादी पक्षाला जागा देण्याबाबत मोठे वक्तव्य समोर आले आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. समाजवादी पक्षासाठी महाविकास आघाडीचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. चर्चेची पहिली फेरी झाली असून आज आम्ही जागावाटप अंतिम करणार आहोत. महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत समाजवादी पक्षासोबतचा आमचा करार हा उत्तर प्रदेशातील काँग्रेस आणि सपा यांच्यातील करारासारखाच असेल. आम्ही आधीच ३० जागा निश्चित केल्या आहेत आणि उर्वरित ६ आज अंतिम होणार आहेत. उद्या सायंकाळपर्यंत काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
"महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (यूबीटी) यांच्यातच बैठका होत आहेत. छोट्या पक्षांच्या बैठका बाकी आहेत. माझ्या ट्विटद्वारे मी त्यांना आठवण करून देत होतो की उशीर होत आहे आणि तुम्ही सर्व याद्या अंतिम करत आहात. मी ऐकले की काँग्रेसही काही घोषणा करणार आहे, म्हणून मी ट्विट केले. आम्हाला राग नाही. काल अखिलेश यादव आणि राहुल गांधी काश्मीरमध्ये होते, त्यांना चर्चा करता यावी म्हणून मी ट्विट केले. मी १२ जागा मागत आहे. भिवंडीत काँग्रेस जिंकू शकत नाही पण मी जिंकू शकतो," असे अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
त्याआधी अबू आझमी यांनी ट्वीटद्वारे आपला रोष व्यक्त केला होता. "महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कोणताही पक्ष मग तो काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो (शरद पवार) किंवा शिवसेना (यूबीटी), समाजवादी पक्षाशी न बोलता किंवा विश्वासात न घेता उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. याचा अर्थ ते समाजवादी पक्षाला महाविकास आघाडीचा भाग मानत नाहीत. समाजवादी पक्षाशी चर्चा न करता कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर करणे चुकीचे ठरेल. तर महाविकास आघाडीचा उद्देश सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र ठेवणे आणि जातीयवादी सरकारविरुद्ध लढणे हे आहे,” असं ट्वीट अबू आझमींनी केले होते.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीनंतर उत्तर प्रदेशाबाहेर आपला पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने, समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात इंडिया जागा मागितल्या आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे १८-१९ ऑक्टोबर रोजी मालेगाव आणि धुळे जिल्ह्यात दोन सभांना संबोधित करतील.