'इतना सन्नाटा क्यूँ है भाई?'; यूपीतील साधूंच्या हत्येनंतर काँग्रेसचे भाजपाला १० खोचक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 06:27 PM2020-04-28T18:27:59+5:302020-04-28T18:32:54+5:30

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधुंच्या निर्घृण हत्येवर ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’ असा जळजळीत सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला केला आहे.

congress sachin sawant slams bjp Over Murders Of 2 Sadhus In UP SSS | 'इतना सन्नाटा क्यूँ है भाई?'; यूपीतील साधूंच्या हत्येनंतर काँग्रेसचे भाजपाला १० खोचक प्रश्न

'इतना सन्नाटा क्यूँ है भाई?'; यूपीतील साधूंच्या हत्येनंतर काँग्रेसचे भाजपाला १० खोचक प्रश्न

Next

मुंबई - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधुंच्या निर्घृण हत्येवर ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’ असा जळजळीत सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला केला आहे. बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधूंच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध करून सावंत यांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

'भाजपाचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे हे निदर्शक आहे. पालघरच्या मॉबलिंचिंगच्या दुर्दैवी घटनेमध्ये दोन साधूंसह तिघांची हत्या झाली होती. या घटनेनंतर त्याच रात्री महाराष्ट्र पोलिसांनी धरपकड करून ११० आरोपींना ताब्यात घेतले व उच्चस्तरीय चौकशीची घोषणा करण्यात आली होती' असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

'पालघरच्या घटनेसाठी चोरांची अफवा कारणीभूत असल्याचे तातडीनेच स्पष्ट झाले होते. तरीही भाजपाने त्या घटनेला धार्मिक रंग देऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तोच भारतीय जनता पक्ष बुलंदशहरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडाबाबत 'कानठळ्या बसवणारे मौन' धारण करून बसला आहे. यातून त्यांचा दुतोंडीपणा आणि कोरोनासारख्या संकटकाळातही राजकारण करण्याची निंदनीय प्रवृत्ती चव्हाट्यावर आली आहे' अशा शब्दांत सचिन सावंत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

बुलंदशहर येथील घटनेच्या अनुषंगाने त्यांनी भाजपला पुढीलप्रमाणे दहा प्रश्नही विचारले आहेत.

१.   केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पालघरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तात्काळ फोन केला होता. तसाच फोन ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कधी करणार आहेत?

२.   भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासह एकाही नेत्याने यासंदर्भात निषेधाचं ट्विट केलेलं नाही. ही हत्या निषेधार्ह नाही का?

३.  पालघरचे साधू आणि बुलंदशहरमधील साधूंमध्ये फरक आहे का?

४.   बुलंदशहरातील साधूंचे मारेकऱ्याबरोबर आधी भांडण झाले होते. तरीही त्या साधूंना संरक्षण का देण्यात आले नाही?

५.   साधूंशी भांडण झाल्यानंतर त्या मारेकऱ्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई का झाली नाही?

६.   हे उत्तर प्रदेश सरकारचे इंटिलिजन्स फेल्युअर आहे का?

७.  भर लॉकडाऊनमध्ये हत्येचे सुनियोजित षडयंत्र आखून तलवारीने साधूंची हत्या होते, उत्तर प्रदेश सरकारचे अपयश नाही का?

८.   या हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपा करणार आहे का?

९.  पालघरच्या घटनेनंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा राजीनामा मागणारे भाजपा नेते आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार आहेत का?

१०. पालघर साधूंच्या हत्येनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी सात्विक आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. काही भाजपा नेते तर एक वेळचा अन्नत्यागही करत आहेत. आता बुलंदशहरमधील साधूंच्या हत्येच्या निषेधार्थ हे भाजपा नेते दुसऱ्याही वेळचे अन्नत्याग करणार आहेत का?


 

Web Title: congress sachin sawant slams bjp Over Murders Of 2 Sadhus In UP SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.