शिवसेनेला कडवी झुंज देण्यासाठी काँग्रेसकडून तगड्या उमेदवाराचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 01:36 AM2019-08-08T01:36:29+5:302019-08-08T01:36:58+5:30

सहा जण स्पर्धेत; मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष

Congress seeks strong candidate to fight Shiv Sena bitterly | शिवसेनेला कडवी झुंज देण्यासाठी काँग्रेसकडून तगड्या उमेदवाराचा शोध

शिवसेनेला कडवी झुंज देण्यासाठी काँग्रेसकडून तगड्या उमेदवाराचा शोध

Next

- योगेश जंगम 

मुंबई : जोगेश्वरी पूर्व विधानसभेमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कडवी झुंज देणाऱ्या उमेदवाराचा काँग्रेसकडून सध्या शोध सुरू आहे. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघोतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी तब्बल सहा जण इच्छुक असून, त्यांनी मुलाखतीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

जोगेश्वरी पूर्व हा मराठी बहुल विभाग असल्याने या विभागामध्ये मराठी मते नेहमी निर्णायक ठरत आली आहेत. या मतदार संघामध्ये २००९ सालापासून आमदार असलेले रवींद्र वायकर यांनी चांगली पकड बसविली आहे. वायकरांविरोधात यावेळी कडवी झुंज देणाºया उमेदवाराचा शोध काँंग्रेसकडून सुरू आहे. दादरच्या टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. जोगेश्वरी पूर्व मतदार संघातून काँगेसचे पदाधिकारी सुनील कुमरे, ताज मोहम्मद शेख, भरतकुमार सोळंकी, पुष्पा भोळे, सुनील चव्हाण यांनी यंदा निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे. लवकरच या सहा इच्छुक उमेदवारांपैकी एका उमेदवारीची निवड करण्यात येणार आहे.

आगामी निवडणुकीमध्ये मनसे आघाडीसोबत निवडणूक लढवेल, अशी चर्चा आहे. जर मनसे आघाडीमध्ये सामील झाली, तर काँग्रेस उमेदवाला निश्चितपणे बळ येणार आहे. कारण २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये मनसेच्या भालचंद्र अंबुरे यांना ११ हजार ८७४ मते मिळाली होती, तर २००९ सालच्या निवडणुकीमध्ये मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढणाºया संजय चित्रे यांना तब्बल २६ हजार ९३४ मते मिळाली होती. मनसे तटस्थ राहिली, तर आघाडीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे.

मनसे काय भूमिका घेतेय, यावरसुद्धा यंदा चित्र बदलू शकते. मनसेमधूनही चार जणांनी या विभागातून निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शविली आहे. यामध्ये मनसेचे उपाध्यक्ष प्रवीण मर्गज, विभाग अध्यक्ष प्रमोद म्हैसकर, महिला उपाध्यक्ष सुगंधा शेट्टे, मनविसेचे उपाध्यक्ष नवनाथ कदम हे पदाशिकारी इच्छुक आहेत. मनसेने आघाडीमध्ये सामील न होता स्वतंत्रपणे निवडणूक लढविली, तर जोगेश्वरीतील मराठी मतांचे विभाजन होणार हे नक्की. याचा फटका वायकरांना बसू शकतो.

युती झाल्यास उमेदवाराला लाभ, स्वतंत्र लढल्यास कडवी झुंज
जोगेश्वरी पूर्व मतदार संघामध्ये तीन नगरसेवक भाजप, तीन नगरसेवक शिवसेना तर एक नगरसेवक राष्ट्रवादीचा आहे. उत्तर पश्चिम विभागामधून गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये सेना भाजपाचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. युती झाली, तर युतीच्या उमेदवालाला नक्की फायदा होईल, वेगवेगळे लढले, तर आघाडीचा उमेदवार कडवी झुंज देऊ शकतो. भाजपमधून या ठिकाणी उज्ज्वला मोडक या तिकिटासाठी आपला दावा करू शकतात, तर भाजपा नगरसेवक पंकज यादव यांच्या नावाचीही चर्चा आहे.
जोगेश्वरी पूर्वमध्ये राष्ट्रवादीचे बळ त्यामानाने कमी आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते. तेव्हा राष्ट्रवादीच्या दिनकर तावडे यांना २ हजार ३६३ मते मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार राजेश शर्मा यांना २६ हजार ६१७ मते मिळाली होती. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र निवडणूक लढले होते. त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवार अशोक जगताप यांनी तब्बल ५० हजार ५४३ मते मिळविली होती. यंदा आघाडीला मनसेची साथ लाभली, तर यंदाची निवडणुक अटीतटीची होऊ शकते.

Web Title: Congress seeks strong candidate to fight Shiv Sena bitterly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.