शिंदे-फडणवीस कोल्डवॉरवर काँग्रेस नेत्यांची टीका; म्हणाले, “सावली म्हणते मीच मुख्यमंत्री”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:29 IST2025-02-19T17:23:20+5:302025-02-19T17:29:23+5:30

Congress Harshvardhan Sapkal News: भाजपा विचार नाही, तर ईडी पुढे घेऊन जात आहे. संविधान नाही, तर सत्ता पुढे घेऊन जात आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली.

congress state president harshvardhan sapkal criticized bjp and mahayuti | शिंदे-फडणवीस कोल्डवॉरवर काँग्रेस नेत्यांची टीका; म्हणाले, “सावली म्हणते मीच मुख्यमंत्री”

शिंदे-फडणवीस कोल्डवॉरवर काँग्रेस नेत्यांची टीका; म्हणाले, “सावली म्हणते मीच मुख्यमंत्री”

Congress Harshvardhan Sapkal News: बीड, परभणी मुद्द्यावरून विरोधकांनी महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. यातच आता मागील काही दिवसांपासून सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा आहे. त्यात खासदार संजय राऊतांनीही मंत्रालयात अंडरवर्ल्ड सुरू आहे. राजकीय अराजकता निर्माण झालीय असा आरोप केला. यानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांनी यावर भाष्य करताना भाजपावर जोरदार टीका केली आहे. 

राज्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांची सावली 'मीच मुख्यमंत्री',  असे म्हणत आहे. काही प्रवृत्ती देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. या प्रवृत्तींकडून मीच मोठा, असे सांगण्याचा प्रयत्न होत आहे. हे सरकार निर्ढावलेले आहे. त्यांच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. आंदोलन करा किंवा अजून काही करा. पण यांना फरक पडत नाही. नैतिकता गुंडाळून ठेवून तांत्रिक कारणे दाखवून चौकशी सुरू आहे, असे सांगत टोलवाटोलवीची भूमिका घेतली जात आहे, अशी टीका काँग्रेसचे नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. 

भाजपा विचार घेऊन नाही तर ईडी घेऊन पुढे जाते

हे सरकार दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ असे काम करत आहे. मतदार यादीत बोगसपणा नाही तर यांच्या सदस्य नोंदणीत सुद्धा बोगसपणा आहे. १ कोटी सदस्य नोंदणी झाली म्हणतात तर मग शिवसेना का फोडली, राष्ट्रवादी का फोडली? भाजपा विचार घेऊन नाही तर ईडी घेऊन पुढे जाते. हे सत्ता म्हणून पुढे जातात संविधान म्हणून पुढे जात नाही, या शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टवरून विरोधकांनी टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांची बाजू घेत बचाव केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन न करता विरोधकांनी राहुल गांधींच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. हा खेळ काही विरोधकांचा नवा नाही, पंडित जवारलाल नेहरू यांच्या संदर्भात अशाच प्रकारचे काम करण्यात आले होते. राहुल गांधींच्या ट्विटचे गुगल ट्रॉन्सलेट केल्यास श्रद्धांजली शब्द येतो आहे. ही एक तांत्रिक चूक पण विरोधक विनाकारण राजकरण करत आहेत. मी त्यांना अभिवादन करतो, मी त्यांचा आदर करतो, हा त्यांच्या मागचा भाव आहे. त्यामुळे विरोधकांनी ध चा मा करु नये, असा पलटवार सपकाळ यांनी केला. 

 

Web Title: congress state president harshvardhan sapkal criticized bjp and mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.