आरे प्रशासनाविरोधात काँग्रेसचा धडक मोर्चा
By मनोहर कुंभेजकर | Published: June 21, 2023 08:13 PM2023-06-21T20:13:37+5:302023-06-21T20:13:55+5:30
संजय निरुपम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आमची आरे प्रशासना विरोधात लढाई न्याय मिळे पर्यंत सुरूच राहील.
मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आरेतील झोपडपट्टीधारकांना झोपडी दुरुस्ती तसेच लाईट मीटर बसविण्यासाठी परवानगी मिळावी व मयूर नगर येथील अन्यायकारक दुकानाच्या तोडक कारवाई विरोधात माजी खासदार संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आरे प्रशासना विरोधात आज दुपारी उत्तर पश्चिम मुंबई काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चात माजी उपमहापौर राजेश शर्मा, जिल्हा अध्यक्ष क्लाव्हई डायस, मुंबई प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनिल कुमरे, माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांसह मोठ्या संख्येने आरेतील रहिवासी व कॉंग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संजय निरुपम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आमची आरे प्रशासना विरोधात लढाई न्याय मिळे पर्यंत सुरूच राहील. आरे प्रशासनाने मयूर नगर येथील औषधांची दुकाने व दवाखाना सुध्दा तोडली असून, जर का या विभागातील एखादा व्यक्तीचा दुर्दैवी मुत्यू झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार म्हणून आरे सीईओ वर गुन्हा दाखल करू तसेच जोपर्यंत आमची संयुक्त मीटिंग होत नाही तो पर्यंत तोडक कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी केली. सुनिल कुमरे यांनी सांगितले की, येत्या १५ दिवसात योग्य तो निर्णय केला नाही तर आम्ही उपोषणास बसू. यावेळी आरेचे उपमुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.