“२५ हजार महिला पोलिसांच्या भरतीचे काय झाले? सुरक्षेसाठी भरीव तरतूद करावी”: विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:08 IST2025-03-19T16:05:35+5:302025-03-19T16:08:07+5:30

Congress Vijay Wadettiwar News: पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना आता सुरक्षेसाठी झगडावे लागत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

congress vijay wadettiwar criticized state govt over various issues in vidhan sabha | “२५ हजार महिला पोलिसांच्या भरतीचे काय झाले? सुरक्षेसाठी भरीव तरतूद करावी”: विजय वडेट्टीवार

“२५ हजार महिला पोलिसांच्या भरतीचे काय झाले? सुरक्षेसाठी भरीव तरतूद करावी”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना आता सुरक्षेसाठी झगडावे लागत आहे, अशा वेळी महिला सुरक्षेसाठी तुटपुंजी तरतूद सरकारने केली यावर काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ हजार महिला पोलिसांची भरती करणार अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले? महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणावा अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.

विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुणे बस स्थानकात महिलेवर अत्याचार झाला केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली जर महिला सगळीकडे असुरक्षित असतील तर मग सुरक्षित कोण? NCRB ची आकडेवारी सांगते महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण दिवसाला १२६ गुन्हे नोंदवले जातात तर बालकांविरोधात दररोज ५५ गुन्ह्यांची नोंद होते. दरवर्षी ६४ हजार महिला महाराष्ट्रातून गायब होतात, त्यांचे काय होते? अशी स्थिती असताना निर्भया योजने अंतर्गत महिला मदत कक्षाच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात फक्त २००० रुपये तरतूद केली आहे. या सरकारला निर्भया फंडचा विसर पडला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते असताना निर्भया फंडचा गैरवापर शिंदे गटाने केला तेव्हा टीका केली होती, आज अजितदादा यांनाच निर्भया फंडचा विसर पडला आहे. अर्थसंकल्पात महिला सुरक्षेचा  उपाय योजनासाठी ८ हजार रुपये दिले आहेत, एक मंत्र्यांच्या कार्यालयात चहा नाश्तासाठी याहून अधिक खर्च होतो अशी टीका वडेट्टीवर यांनी केली. त्यामुळे महिला सुरक्षेसाठी भरीव तरतूद करण्यात यावी ही मागणी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

त्या मंत्र्याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे

नागपूर इथे हिंसाचार भडकला याप्रकरणी मुख्यमंत्री यांनी चित्रपटाला दोष दिला. पण राज्याच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री संविधानाची शपथ घेऊन द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान ,अशी सतत भडकाऊ वक्तव्य केली, त्या मंत्र्याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. छावा कांदबरी अनेक वर्षापूर्वी आली, चित्रपट येऊन पण महिने होऊन गेले पण नागपूरचा कोरटकर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला यांच्यावर कारवाई होत नाही. समाजात द्वेष तुम्ही पसरवणार आणि सरकार जबाबदारी कशी झटकू शकते. नागपूर मध्ये दगड आले, शस्त्र आली, पेट्रोल बॉम्ब आले असे मंत्री सांगतात मग हे जमा होईपर्यंत पोलिस काय करत होते? हे पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

दरम्यान, गोसीखुर्द प्रकल्पाला सुप्रमा मिळावा म्हणून प्रस्ताव दिला आहे पण अजूनही कारवाई होत नाही. नवी मुंबई मधील कोंढाणे धरणाचे काम सिडकोला दिले आहे. या धरणाची किंमत ८०० कोटी वरून १४०० कोटी पर्यंत वाढवण्यात आली आहे. एका विशिष्ट माणसाला हे काम देण्यासाठी प्रकल्पाची किंमत वाढवली आहे, या कामाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.महाराष्ट्रात जल जीवन मिशनचे काम रखडले आहे.कंत्राटदार काम अर्धवट सोडून निघून गेले आहेत,हे काम कोण पूर्ण करणार असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

 

Web Title: congress vijay wadettiwar criticized state govt over various issues in vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.