“ऋण काढून सण करायला लावणारा अतिरिक्त अर्थसंकल्प”; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 08:03 PM2024-07-02T20:03:25+5:302024-07-02T20:04:04+5:30

भाजपाने अजितदादांना अग्निवीर केले आहे. महायुतीत कुरघोडी केली जाते, अशी टीका करत विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्प आणि त्यातील तरतुदींबाबत राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

congress vijay wadettiwar slams mahayuti govt over budget and schemes | “ऋण काढून सण करायला लावणारा अतिरिक्त अर्थसंकल्प”; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका

“ऋण काढून सण करायला लावणारा अतिरिक्त अर्थसंकल्प”; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका

मुंबई: राज्याचे उत्पन्न घटले आहे. राज्यात विजेची निर्मिती कमी झाली. उद्योग बाहेर गेले. यावरून राज्याची आर्थिक स्थिती मंदावल्याचे दिसून येते. तरी केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. वित्तीय तूट कशी भरून काढणार याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, अशी सरकारची परिस्थिती आहे. राज्यावर कर्जाचा, व्याजाचा बोजा वाढत आहे. विकास दराची गती मंदावली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावल्याने गरीबांचे हाल सुरू आहेत. कर्ज आणि व्याज यांमुळे कर आकारणीत वाढ केली जात आहे. सरकारच्या या आकड्यांच्या जगलरीमुळे राज्यावर साडेसात लाख कोटींच्यावर कर्जाचा आकडा जाणार आहे. त्यामुळे खोदा पहाड निकला चुहा, अशी या अर्थसंकल्पाची परिस्थिती आहे, या शब्दांत काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पावर हल्लाबोल केला. 

विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्पावर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चर्चेला सुरूवात केली. यावेळी वडेट्टीवार यांनी महायुतीला धारेवर धरले. अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याला कर्जबाजारी करणारा आहे. गेल्या दोन वर्षात महायुतीने २ लाख कोटी रूपये कर्ज काढले आहे. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या फसव्या घोषणांसाठी १ लाख कोटी रूपयांचे कर्ज काढून राज्याला खड्ड्यात घालण्याचे नियोजन या अतिरिक्त अर्थसंकल्पात केले आहे. १ लाख १७ हजार कोटी रूपये कर्जाचा हप्ता जाणार आहे. त्यामुळे ऋण काढून सण करायला लावणारा हा अतिरिक्त अर्थसंकल्प आहे. जुन्या योजनांचा निधी कमी करायचा नव्या फसव्या योजनांची घोषणा करायची, अशी या सरकारच्या कामाची पद्धत आहे. महाराष्ट्राला गुजरातच्या मागे नेण्याचं महापाप या सरकारन केले आहे, या शब्दांत वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.

थकित वीज बील माफ करण्यात यावे

राज्याचा आर्थिक विकास हे उद्दिष्ट न ठेवता केवळ राजकीय उद्दीष्ट ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे हा अतिरिक्त अर्थसंकल्प आहे की महायुतीच्या निवडणुकीचा जाहीरनामा आहे की निवडणुक जुमला आहे असा प्रश्न जनतेला पडला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे ६५ हजार कोटींचे थकित वीज बील माफ करण्यात यावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. सत्तेचे वाटेकरी एकमेकांवर कुरघोडी  करत असल्याने राज्याची परिस्थिती बिघडली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली पण अर्थसंकल्पाला मंजूरी मिळण्याआधीच शासन निर्णय काढला. आमच्या भगिनी या सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी गरज नसताना संसदेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचा उल्लेख केला. हे योग्य नव्हते, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

दरम्यान, मुलींच्या परदेशी शिक्षणाची योजना फसवी आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना तेलंगणात जास्त मानधन आहे. महाराष्ट्रात मात्र उपेक्षाच आहे. बार्टी, सारथी, अमृत, महाज्योती या संस्थात गैरप्रकार होत आहेत. सरकारने महामंडळांच्या घोषणा केल्या पण निधीची तरतूद केली नाही. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सामाजिक न्याय विभागात मोठा भ्रष्टाचार आहे. परदेशी शिष्यवृत्तीसाठी निधी नाही, त्यामुळे मुलांची फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांसाठी योजना आणता, स्मारकांच्या घोषणा करता, शिष्यवृत्या जाहीर करता पण त्यासाठी तुम्ही निधी देत नाही. त्यामुळे तुमच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. अर्थमंत्री अजित पवार यांची महाविकास आघाडीत असताना अर्थसंकल्प सादर करताना देहबोली  होती तशी आता दिसून येत नाही. अर्थमंत्र्यांवर कूरघोडी केली जातेय. महायुतीमधीलच लोक अर्थमंत्र्यांची समाजमाध्यमांमध्ये खिल्ली उडवण्याची व्यवस्था करतात. भाजपाने तर दादांना अग्निवीर केले आहे. त्यामुळे दादांनी शेजाऱ्यांपासून जपूर रहावे, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी दिला.
 

Web Title: congress vijay wadettiwar slams mahayuti govt over budget and schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.