विधानसभेला काँग्रेस देणार तरुणांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 05:25 AM2019-07-19T05:25:38+5:302019-07-19T05:25:50+5:30

जे काँग्रेस पक्ष सोडून गेले त्यांची चिंता करू नका, उलट त्यांच्यामुळे तरुणांना संधी निर्माण झाली आहे.

Congress will give opportunity to the youth to the Assembly | विधानसभेला काँग्रेस देणार तरुणांना संधी

विधानसभेला काँग्रेस देणार तरुणांना संधी

Next

मुंबई : जे काँग्रेस पक्ष सोडून गेले त्यांची चिंता करू नका, उलट त्यांच्यामुळे तरुणांना संधी निर्माण झाली आहे. यात तरुणांचा फायदा आहे हे लक्षात घ्या, असे सांगत नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाईल, असे जाहीर केले. प्रदेशाध्यक्षांच्या या घोषणेचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
प्रचंड उत्साह, कार्यकर्त्यांची अमाप गर्दी, ओसंडून वाहणारे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, काँग्रेस विजयाची घोषणाबाजी, अशा उत्साही वातावरणात राज्य काँग्रेसने मरगळ झटकून टाकत गुरुवारी पदग्रहण समारंभ दणक्यात साजरा केला. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.
मी कुठल्याही गटातटाचे राजकारण करणार नाही, मात्र मी जरी सगळ्यांना समान ठेवण्याची भूमिका घेतली; तरी तुम्हाला तुमच्या मनातले गट-तट आधी बाजूला काढावे लागतील. तुमचे मतभेद, गट बाजूला काढून फक्त काँग्रेसला जिंकवण्यासाठी म्हणून एकत्र या. काँग्रेसच काँग्रेसला हरवते हा इतिहास बदलून आपण सगळ्यांनी जीव तोडून काम करून बदलून दाखवू असे सांगत थोरात यांनी, ज्या ज्या वेळी काँग्रेस पराभूत झाली त्या त्यावेळी ती पुन्हा उसळून सत्तेत आली याची अनेक उदाहरणे दिली.
शक्य असणाऱ्या सगळ्या ठिकाणी तरुणांना संधी दिली जाईल, येत्या काळात कॉलेजच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये देखील काँग्रेस सक्रियतेने सहभागी होईल. शिवाय विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्यात अशी मागणी लावून धरली जाईल असेही ते म्हणाले.
रजनीताई यांच्या भाषणाला प्रतिसाद
बाळासाहेब थोरात तुम्ही गटातटाचे राजकारण करणार नाहीत, ही आमची ठाम खात्री आहे. हा माझ्या गटाचा; तो त्यांच्या गटाचा असे तुम्ही बोलणार नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीत सगळे तुम्ही जो आदेश द्याल त्याचे पालन सगळे करतील, असे सांगून रजनी पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर प्रहार केला. त्यावेळी सभागृहात प्रचंड टाळ्यांनी त्यांच्या भाषणाला दाद मिळाली. बाळासाहेब थोरात आणि त्यांचे पाच कार्याध्यक्ष म्हणजे पाच पांडव आहेत, अशा शब्दात त्यांनी नव्या कार्याध्यक्ष यांचाही उल्लेख केला. पुढे प्रत्येक नेत्याने हाच सूर आळवला.
बाळासाहेब थोरात हे बेरजेचे राजकारण करणारे नेते आहेत. येणाºया दोन-तीन महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. अशा वेळी मतभेद, तंटे विसरून सगळ्यांनी काम करण्याची वेळ आली आहे. सगळ्या जाती-धर्माच्या नेत्यांना पक्षनेतृत्वाने नव्या पक्ष बांधणीत संधी दिली आहे. त्यामुळे जे कोणी नाराज झाले असतील त्यांना आपल्यासोबत जोडून घ्या, हे युद्ध सोपे नाही असे मत माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. तर माजी खा. राजीव सातव यांनी वेगळी भूमिका घेतली. जे पक्ष सोडून गेले किंवा जात आहेत त्यांना बँडबाजा लावून सोडून या, आणि नव्या तरुणांना संधी द्या असे ते म्हणाले त्यालाही कार्यकर्त्यांंमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सत्ता असताना आणि सत्ता नसताना प्रदेशाध्यक्ष पद मिळणे यात मोठा फरक आहे, असे सांगत त्यामुळे मी जेवढे कष्ट घेतले त्यापेक्षाही जास्त कष्ट तुम्हाला करावे लागतील, असे मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, नाना पटोले नसीम खान यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचेही भाषण झाले.
नावातच विजय - वडेट्टीवार
बाळासाहेब थोरात यांचे नाव विजय आहे. माझेही नाव विजय आहे. आम्ही राज्यात काँग्रेसला विजय मिळवून देऊ असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
>दिल मिलें ना मिले, हात मिला कर चले
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या पदग्रहण समारंभात गटा
तटाच्या राजकारणावरुन बरीच टोलेबाजी झाली.
तोच धागा पकडत पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी, ‘दिल मिलें ना मिले, कम से कम हात तो मिला कर चले..!’
अशा शब्दांत या वादावर पडदा टाका असे आवाहन केले.

Web Title: Congress will give opportunity to the youth to the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.