२६/११ च्या पीडितेने घरासाठी केलेल्या अर्जावर विचार करा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 04:36 PM2020-10-13T16:36:54+5:302020-10-13T16:37:13+5:30
Consider the 26/11 victim's : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
मुंबई : २६ नोव्हेंबर २०११ रोजी मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील सर्वात लहान पीडिता देविका रोटावन हिने शासनाकडून तिच्या कुटुंबियांसाठी घर मिळवण्यासाठी व महाविद्यालयीन शिक्षणाची तरतूद करण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर विचार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिले. न्या. नितीन जामदार व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने यांनी निबंधकांना देविका रोटावन हिच्या याचिकेची प्रत मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठवण्याचे निर्देश दिले.
१९ जुलैपासून देविकाचे निवेदन मुख्य सचिवांपुढे प्रलंबित आहे. मात्र, याचिकेत असलेली तपशीलवार माहिती निवेदनात नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. तसेच देविकालाही तिच्या याचिकेची प्रत मुख्य सचिव कुमार यांच्यापुढे सादर करण्याची परवानगी दिली. वांद्रे येथील सुभाष नगर मधील चाळीत राहते. मात्र, ती व तिचे कुटुंबिय त्या खोलीचे भाडे भरण्यास असमर्थ आहेत. भाडे न भरल्यास आपल्याला व आपल्या कुटुंबियांना रस्त्यावर राहण्याची वेळ येईल, अशी भीती देविकाने न्यायालयात व्यक्त केली.
देविकाची केस असामान्य आहे, असे तिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. देविकाच्या पायाला पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याच्या एके-४७ मधील गोळी तिच्या पायाला लागली. खटल्यात ती सरकारी वकिलांची साक्षीदार म्हणून न्यायालयात उभी राहिली. तिच्या अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. तिच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे, असे तिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. देविकाने अनेक खात्यांकडे निवेदन सादर केले. अद्याप कोणीही तिला नकार दिलेला नाही. त्यामुळे आम्ही मुख्य सचिवांनाच तुमच्या विनंतीवर विचार करायला सांगू, असे न्यायालयाने म्हटले.
वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात देविका कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी ती नऊ वर्षांची होती. हल्ल्याच्या दिवशी देविका तिच्या पालकांसह पुण्याला चालली होती. ट्रेन पकडण्यासाठी ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ला आली होती. त्याच वेळी दहशतवादी अजमल कसाब व त्याच्या साथीदाराने स्थानकावर असलेल्या सर्व प्रवाशांवर एके -४७ ने बेछूट गोळीबार केला.त्यात देविकाही गंभीर जखमी झाली.