मला पक्षाबाहेर ढकलण्यास काही काँग्रेस नेत्यांचे षडयंत्र, सत्यजीत तांबे यांचा थेट आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 11:35 AM2023-02-05T11:35:22+5:302023-02-05T11:35:49+5:30
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरल्याने पक्षाकडून त्यांच्यावर झालेली कारवाई आणि आरोपांबाबत सत्यजित यांनी शनिवारी अनेक खुलासे केले.
मुंबई/नाशिक : बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी आणि मला पक्षाबाहेर ढकलण्यासाठीच काँग्रेसच्या काही नेत्यांनी षडयंत्र रचले. स्क्रिप्ट अगोदरच तयार होती, असा गंभीर आरोप करीत विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी एबी फॉर्मच्या गोंधळाबाबत प्रदेश काँग्रेसच्या कार्यपद्धतीविषयी अनेक गौप्यस्फोट केले. असे असले तरी आपण अजूनही पक्ष सोडलेला नसून अपक्ष आमदार म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरल्याने पक्षाकडून त्यांच्यावर झालेली कारवाई आणि आरोपांबाबत सत्यजित यांनी शनिवारी अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी कुणाचेही नाव न घेता प्रदेश काँग्रेसच्या कामकाजावरच संशय व्यक्त केला.
काँग्रेसने दाखवली कोऱ्या ‘एबी फॉर्म’ची झेरॉक्स
- सत्यजित तांबे यांना कोरा एबी फॉर्म दिला होता. त्यांच्याकडून ‘ओके’सुद्धा आले होते, असा दावा करीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एबी फॉर्मची झेरॉक्स दाखवत पुरावाच दिला.
- सत्यजित यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. अनेक दिवस त्यांच्या फडणवीस यांच्याशी भेटी झाल्या, असा दावा करीत सत्यजित यांना ईडीची भीती होती का, असा थेट सवालही लोंढे यांनी केला.
- ‘माझी व सत्यजित यांची उमेदवारी दाखल करण्यापूर्वी कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, आज सकाळी त्यांचा फोन आला होता. मंगळवारी शक्य असेल तर मी मुंबईत समक्ष बोलू, असे त्यांना सांगितले आहे’, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
एबी फॉर्मवर नावच नव्हते...
- तांबे म्हणाले, उमेदवारी दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर प्रदेश काँग्रेसकडून दोन एबी फॉर्म पाठविण्यात आले. पाकीट उघडले तेव्हा औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक मतदारसंघाचे अर्ज निघाले. दुसऱ्यावेळी पाठविलेल्या एबी फॉर्मवर केवळ डॉ. सुधीर तांबे यांचे नाव होते, माझे नाव वगळले गेले. प्रदेश काँग्रेसने इतकी गंभीर चूक केली असताना आता पक्षश्रेष्ठी काय कारवाई करणार?
- तांबे, थोरात कुटुंबीयांना बदनाम करण्याचे काम काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात आले. काँग्रेसचा पाठिंबा मिळावा यासाठी दिल्लीत चर्चा करीत असताना दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करीत होते, असा आरोप तांबे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता केला.
- एबी फॉर्मचा प्रकारच नव्हे, तर अनेक गंभीर मुद्दे आहेत. त्याबाबतचे रेकॉर्डिंग आपणाकडे आहे. ते ऐकविले तर पक्षावर त्याचे गंभीर परिणाम होतील. पक्षांतर्गत प्रश्न पक्षातच सोडवायचे अशी तांबे कुटुंबीयांची संस्कृती आहे. त्यामुळे इतर मुद्द्यांवर बोलणार नसल्याचे तांबे म्हणाले.