कोरोनाचा वाढता धोका! उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक; मोठा निर्णय घेणार?
By मोरेश्वर येरम | Published: December 21, 2020 05:41 PM2020-12-21T17:41:57+5:302020-12-21T17:44:26+5:30
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेता राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्था संबंधिचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा' या त्यांच्या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेता राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्था संबंधिचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतीश पाटील आणि शंभूराजे देसाई उपस्थित आहेत. यासोबतच अतिरिक्त सचिव सिताराम कुंटे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, कायदा-सुव्यवस्था अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील देखील बैठकीला हजर आहेत.
२५ ते ३१ डिसेंबर या काळातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी ही बैठक होत आहे. कोरोनाचा काळ असताना ख्रिसमस आणि नववर्ष स्वागतासाठी काही निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नववर्ष स्वागतासाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स संघटनेने मध्यरात्रीपर्यंत आस्थापना सुरू ठेवण्याची मागणी सरकारकडे केली आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नववर्ष स्वागताच्या रात्री तरुणाईची गर्दी होण्याचीही शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीचं आयोजन केल्याचं समजतं.