'कोरोनाच्या निमित्ताने मुंबईतील महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे वळविण्याचा डाव'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 06:39 PM2020-05-21T18:39:37+5:302020-05-21T18:39:54+5:30

मुंबई अन् महाराष्ट्राला केंद्राकडून सापत्नभावाची वागणूक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांचा घणाघाती आरोप

'Corona's occasion to shift important industries from Mumbai to Gujarat', yashomati thakur MMG | 'कोरोनाच्या निमित्ताने मुंबईतील महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे वळविण्याचा डाव'

'कोरोनाच्या निमित्ताने मुंबईतील महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे वळविण्याचा डाव'

Next

मुंबई - कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत झालेला असताना केंद्र सरकारकडून मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या आठवड्यात केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजमध्येही राज्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आले असून मुंबई आणि महाराष्ट्राला केंद्राकडून सतत सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला आहे. कोरोनाच्या निमित्ताने मुंबईतील सर्व महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे वळविण्याचा केंद्राचा कुटिल डाव असून तो आम्ही हाणून पाडू, असा निर्धारही श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.  

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पादनात (जीडीपी) मुंबईचा वाटा सर्वाधिक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय स्टेट बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार यांसह अनेक खासगी बँकांची तसेच कॉर्पोरेट कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. अनेक औद्योगिक वसाहती मुंबई व परिसरात आहेत. नामांकित उद्योगसमूहांच्या मालकांचे निवासस्थानही मुंबईत आहे. बॉलिवूडचे मुख्य केंद्रही मुंबईत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईचे महत्त्व अन्यसाधारण आहे. दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल मुंबईत होऊन त्याचे महसुली उत्पन्न केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होत असते. असे असताना सध्या करोनाग्रस्त असलेल्या मुंबईकडे मात्र केंद्र सरकारने साफ दुर्लक्ष केले असल्याचा स्पष्ट आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला आहे. 

ऍड. ठाकूर म्हणाल्या की, ‘मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही. देशाची आर्थिक राजधानीही आहे. मुंबईत सध्या करोनाने कहर केला आहे. दिवसागणिक करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने देशाच्या या आर्थिक राजधानीकडे विशेष लक्ष देणे अपेक्षित होते. मात्र, केंद्र सरकारने साफ निराशा केली आहे. २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजमध्ये मुंबईसाठी विशेष तरतूद असेल, अशी आमची अपेक्षा होती. तीही केंद्राने फोल ठरवली. मुंबई जगली तर महाराष्ट्र जगणार आहे आणि महाराष्ट्र जगला तर देश जगणार आहे. परंतु केंद्राने या वस्तूस्थितीकडे हेतुतः दुर्लक्ष केले आहे. केंद्राकडून मुंबई आणि महाराष्ट्राला सातत्याने सापत्नभावाची वागणूक दिली जात असून हे सहन करण्यापलीकडचे आहे’.

अलीकडेच केंद्र सरकारने मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये हलवले. आताही करोनाच्या आडून मुंबईतील उद्योग अहमदाबादनजीक उभारण्यात येत असलेल्या गिफ्ट (गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी) या नवनगराकडे वळवण्याचा केंद्र सरकारचा कुटिल डाव आहे. केंद्राचा हा कुटिल डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे ऍड. ठाकूर यांनी ठणकावले. मुंबईत सातत्याने वाढत असलेल्या करोनाबाधितांच्या संख्येला आळा घालून मुंबईतील सर्व व्यवहार पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार अहोरात्र परिश्रम करत आहे. राज्य सरकारच्या या प्रयत्नांना केंद्र सरकारने पाठबळ देणे आत्यंतिक गरजेचे आहे. मुंबईतील वैद्यकीय सेवा सुविधा विस्तारण्यासाठी तसेच करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मुंबईसाठी विशेष निधी जाहीर करण्याची आवश्यकता आहे. करोना संकटातून मुंबई लवकर सावरावी व आर्थिक राजधानीचा आणि पर्यायाने देशाचाही आर्थिक कारभार सुरळीत व्हावा यासाठी केंद्र सरकारने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून मुंबई आणि महाराष्ट्रावरील अन्याय दूर करावा, अशी आग्रही मागणीही मंत्रिमहोदय ऍड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली. 
 

Web Title: 'Corona's occasion to shift important industries from Mumbai to Gujarat', yashomati thakur MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.