Coronavirus: हा तर बेजबाबदारपणाचा कळस आहे; अजित पवारांनी ‘त्या’ लोकांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 02:57 PM2020-04-06T14:57:51+5:302020-04-06T14:59:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील वीज बंद करुन घराच्या दरवाजात, बाल्कनीत दिवे, मोबाईल टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं

Coronavirus: Dy CM Ajit Pawar slammed those people who culmination of irresponsibility in lockdown situation pnm | Coronavirus: हा तर बेजबाबदारपणाचा कळस आहे; अजित पवारांनी ‘त्या’ लोकांना फटकारलं

Coronavirus: हा तर बेजबाबदारपणाचा कळस आहे; अजित पवारांनी ‘त्या’ लोकांना फटकारलं

Next
ठळक मुद्दे हा प्रसार थांबवायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडणं हाच प्रभावी मार्ग कोरोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावाकोरोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे

मुंबई -  चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांना फटका बसला आहे. अमेरिकेत साडेतीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ९ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ४ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील वीज बंद करुन घराच्या दरवाजात, बाल्कनीत दिवे, मोबाईल टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं. नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसादही मिळाला पण काही उत्साही मंडळीनी पुन्हा मशाली घेऊन रस्त्यावर आले. त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या लोकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारलं आहे.

राज्यात कोरोनारुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तरीही परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवं आहे. पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही, मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास कोरोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा, कोरोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढं यावं. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावं, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरीत कळवावी, असं आवाहनही अजितदादांनी लोकांना केलं आहे.

दरम्यान, राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पोलिस, सफाई कर्मचारी अशा कोरोनाविरुद्धच्या यंत्रणेतील घटकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसू लागला आहे. हे चिंताजनक आहे. हा प्रसार थांबवायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडणं आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी घरात थांबणं, संशयित व्यक्तींनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणं हाच प्रभावी मार्ग असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचसोबत टाळेबंदीमुळे देशाची, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली असली तरी त्यावर नंतरच्या काळात मात करता येईल, परंतु आता कोरोनाचा लढा हा एकजुटीनंच लढला पाहिजे. ही लढाई सर्वांची आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीनं उतरले आहेत ही बाब बळ देणारी आहे. राज्यातल्या, देशातल्या जनतेची एकजूट व कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धारच आपल्याला या लढाईत यश मिळवून देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Coronavirus: Dy CM Ajit Pawar slammed those people who culmination of irresponsibility in lockdown situation pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.