CoronaVirus : नागरिकांच्या सोयीसाठी हॉटेल्सच्या ‘होम डिलिव्हरी’ला परवानगी - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 01:04 AM2020-03-28T01:04:17+5:302020-03-28T01:05:05+5:30
CoronaVirus : हॉटेल्सनी आपल्या कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि कोरोना सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
मुंबई : नागरिकांच्या सोयीसाठी हॉटेल्सना त्यांचे किचन सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्सना आता ‘होम डिलिव्हरी’ सेवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ घरपोच अथवा सोसायट्यांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. मात्र, हॉटेल्सनी आपल्या कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि कोरोना सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाºया पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्व प्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाºया दोघांनीही, कोरोनासंदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे, गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते म्हणाले, राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायमेट्रिकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी व्यस्त असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाºया वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही.