CoronaVirus News: भारतात 15 ऑगस्टला लस येणार, पण कशी?, राज्यातील काँग्रेस नेत्याचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:38 PM2020-07-03T15:38:06+5:302020-07-03T16:08:58+5:30
कोरोनावरची लस भारत बायोटेकने विकसित केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टिका केली आहे.
मुंबई: भारतात कोरोनावरची पहिली लस तयार करण्यात आली असून, जुलैमध्ये तिची क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कोरोनावरची ही लस भारत बायोटेकने बनवली आहे. पण आता ही लस 15 ऑगस्टपर्यंत बाजारात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात कोव्हॅक्सिनच्या ह्युमन ट्रायल (मानवी चाचणीसाठी) परवानगी देण्यात आली आहे. देशात 5 दिवसांच्या आत क्लिनिकल वापरासाठी शासनाकडून ही मंजुरी मिळालेली दुसरी लस आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने जारी केलेल्या पत्रानुसार, या लसीचा मानवावरील प्रयोग 7 जुलै या दिवशी सुरू करण्यात येणार आहे. या नंतर जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्यदिनी ही लस लॉन्च केली जाईल. या पूर्वीत ही लस बाजारात उपलब्ध होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टिका केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण एक मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, कोरोनाचं संकट मोठं आहे. तसेच त्याबाबत कोणालाच अंदाज नाही. त्यातच भारत बायोटेक आणि आयसीएमआर 15 ऑगस्टला लस बाजारात आणणार असं सांगितलं जात आहे. मात्र यावर मला आश्चर्य वाटत आहे. हे नेमकं कसं होणार, धोरण काय असणार असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,25,544 वर पोहचली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20,903 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 379 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 6 लाख 25 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 18 हजारांवर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,27,439 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,79,892 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे.