Coronavirus: क्वारंटाइन म्हणजे डांबून ठेवणे नव्हे; उच्च न्यायालयाने पोलिसांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 08:22 AM2020-05-07T08:22:21+5:302020-05-07T08:22:35+5:30
नारायण हे कोरोनाबाधित नसतानाही पोलिसांनी त्यांना क्वारंटाइन केले, असा आरोप करत नारायण यांचे निकटवर्तीय महेंद्र सिंह यांनी उच्च न्यायालयात हेबिअस कॉरप्स दाखले केले.
मुंबई : क्वारंटाइन म्हणजे कोरोनाबाधित नसतानाही अकारण लोकांना डांबून ठेवणे नव्हे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने प्रशासन व
पोलिसांना सुनावत कोरोनाबाधित नसतानाही क्वारंटाइन केलेल्या एका ट्रेड युनियन संघटनेच्या सदस्याला सोडण्याचा आदेश दिला.
सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनचे सदस्य के. नारायण यांना पोलिसांच्या सूचनेवरून क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली. तर पोलिसांनी नारायण यांच्याविरुद्ध काही गुन्हे नोंदवण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले.
क्वारंटाइनच्या नावाखाली कोरोनाबाधित नसलेल्या धडधाकट माणसाला डांबून ठेवणे योग्य नाही. त्यामुळे धडधाकट माणसालाही
कोरोना होण्याची शक्यता आहे, असे मत न्या. रेवती मोहिते-ढेरे यांनी नोंदविले.
नारायण हे कोरोनाबाधित नसतानाही पोलिसांनी त्यांना क्वारंटाइन केले, असा आरोप करत नारायण यांचे निकटवर्तीय महेंद्र सिंह
यांनी उच्च न्यायालयात हेबिअस कॉरप्स दाखले केले. न्यायालयाने नारायण यांच्या चाचणीचा अहवाल मागितला. त्यातून त्यांना कोरोना
नसल्याचे उघडकीस आले. त्यानुसार, न्यायालयाने नारायण यांना सोडण्याचा आदेश दिला.