Coronavirus: राज्याच्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारवर सूचनांचा पाऊस! एसआरपी बोलावण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 03:07 AM2020-05-08T03:07:35+5:302020-05-08T03:11:41+5:30

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते बैठकीला हजर

Coronavirus: Rain of suggestions on government in all-party meeting of the state! Demand to call SRP | Coronavirus: राज्याच्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारवर सूचनांचा पाऊस! एसआरपी बोलावण्याची मागणी

Coronavirus: राज्याच्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारवर सूचनांचा पाऊस! एसआरपी बोलावण्याची मागणी

Next

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत कोरोनाचा मुकाबला करण्यासंदर्भात सूचनांचा पाऊस पडला. मुंबई असो वा पुणे किंवा नागपूर कुठेही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसत नाही. राजकीय नेतृत्वाने अशावेळी समन्वय राखायचे काम करावे, अशी सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर लॉकडाऊनच्या काळात परिस्थिती हाताळण्यासाठी एसआरपीला बोलवा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे आदी नेते सहभागी झाले होते

मुख्यमंत्री म्हणाले की, माझे आपल्याशी मधूनमधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सूचना मी ऐकतो, माध्यमांतून वाचतो. त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवतो. केंद्र सरकार सुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करीत आहे. केंद्रीय संस्था , लष्कर, पोर्ट ट्रस्ट, यांना आम्ही आयसीयु बेड्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. मुंबईतून परराज्यातील कामगार नेण्यासाठी रेल्वे सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मालेगाव व औरंगाबाद येथे कंटेनमेंट झोनमध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे, तेथील लोकप्रतिनिधीनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली. अजित पवार म्हणाले की, ज्या शेतकºयांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीककर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणे सुरु आहे.

एसआरपीएफ आणा : राज
कंटेनमेंट झोनच्या ठिकाणी पोलीस बळ वाढवावे लागेल . पोलीस थकले आहेत. त्यामुळे एसआरपी फौज आवश्यक आहे. पोलिसांना लोकही गृहीत धरताहेत. अनेक ठिकाणी छोटे दवाखाने बंद आहेत. रुग्णांचे हाल होत आहेत. ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तरुण अडकेल आहेत त्यांच्या घरी जाण्याव्ची व्यवस्था व्हावी. परप्रांतीय कामगार आज ना उद्या परत येतील तेव्हा त्यांच्या तपासणीची व्यवस्था करावी लागेल. आता परत राज्यात परतणाºया परराज्यातील श्रमिक आणि कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी तसेच यापुढे लॉकडाऊन करतांना आगाऊ सूचना द्यावी, असे राज ठाकरे म्हणाले.

शेकापचे आमदार जयंत पाटील, बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील माकपचे अशोक ढवळे, सपाचे अबू आझमी भाकपचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रिपाइंचे डॉ राजेंद्र गवई, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे यांनीही सूचना मांडल्या.


सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या सूचना

  • क्वारंटाईन केंद्रांमध्ये अधिक सुविधा द्याव्यात. त्यांना चांगले भोजन मिळावे.
  • शेतीमालाच्या मार्केटिंगची व्यवस्था करावी, असंघटित कामगार , मोलकरणींना आर्थिक आधार द्यावा.
  • मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी परवानगी द्यावी. कोकणातल्या लोकांसाठी विशेष रेल्वे सोडाव्यात, मालमत्ता कर , उपकर स्थगित करावा.
  • लोकल ट्रेन्स काही प्रमाणात तरी सुरु झाल्या पाहिजेत.
  • कोणाचाही पगार कापू नका. रिक्षा, हातगाड्या मालकांचे कर्ज पुनर्गठीत करावे, कुंभार समाजाकडे मातीची रॉयल्टी मागू नये. नाभिक समाजाला देखील दिलासा मिळावा.
  • शेतकऱ्यांच्या कापूस,धान,तुरी,चना आदी शेतमालाची सरकारने खरेदी सुरू करायला हवी.

Web Title: Coronavirus: Rain of suggestions on government in all-party meeting of the state! Demand to call SRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.