Coronavirus:...अन्यथा आपल्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 03:42 PM2020-05-19T15:42:15+5:302020-05-19T15:50:09+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागासह आरोग्य सेवा आयुक्तालयाने काढलेल्या २० एप्रिल २०२० रोजीच्या आदेशानुसार बंधपत्रिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन मासिक ५५ हजार ते ६० हजार निश्चित करण्यात आले आहे.
मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३५ हजारांच्या वर पोहचला असून आतापर्यंत १ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या संकटाच्या काळात पोलीस, डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहे. अनेक डॉक्टर, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे. मात्र अनेकांप्रमाणे आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्या मानधनात कपात केल्याची माहिती मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात अमित ठाकरे यांनी लिहिलं आहे की, कोरोना आणीबाणीच्या काळात डॉक्टर हाच देव असल्याचा अनुभव सर्वांना येत आहे. राज्यभरातील डॉक्टरांचे कितीही आभार मानले तरीही अपुरेच आहेत, इतकं उत्कृष्ट काम शासकीय सेवेतील डॉक्टर्स निष्ठेने करत आहेत. या डॉक्टरांना देण्यात येणारं मानधनात सरकारने कपात करणे हे कोणत्याही दृष्टीने पटणार नाही असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच सार्वजनिक आरोग्य विभागासह आरोग्य सेवा आयुक्तालयाने काढलेल्या २० एप्रिल २०२० रोजीच्या आदेशानुसार बंधपत्रिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन मासिक ५५ हजार ते ६० हजार निश्चित करण्यात आले आहे. हा निघण्यापूर्वी याच अधिकाऱ्यांना मासिक वेतन, भत्ते मिळून ७८ हजार इतके मानधन मिळत होते. नव्या आदेशानुसार त्यांच्या पगारात सुमारे २० हजार रुपये कपात होणार आहे. या आदेशामुळे तरुण डॉक्टरांच्या मनात असंतोषाचे वातावरण असून ही मानधन कपात अन्यायकारक असल्याचं अमित ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, हरियाणासारख्या राज्यात कोरोना काळात वैद्यकीय व्यावसायिकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून तितक्या उदारपणाची अपेक्षा नसली तरी डॉक्टरांच्या वेतनात कपात होणार नाही याबाबत राज्य सरकारने काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचसोबत ज्या नर्सेसना ३५ हजार रुपये मानधन मिळत होते त्यांना नव्या आदेशानुसार फक्त २५ हजार मानधन मिळणार आहे. हा नर्सेसवर अन्याय आहे. वैद्यकीय अधिकारी आणि नर्सेस यांना त्यांचे पूर्वीचेच वेतन देण्याबाबत आपण त्वरीत कार्यवाही करावी, अन्यथा कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर्स आणि नर्सेस हे योद्धे आहेत या आपल्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही असा टोलाही मनसे नेते अमित ठाकरे यांनी लगावला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली; कोरोनावर लस मिळण्याची आशा वाढली!
आनंदाची बातमी; ‘या’ नैसर्गिक वनस्पतीतून भारत बनवणार कोरोनावर ‘रामबाण’ औषध?
कोरोना नसतानाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प का करतायेत ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’चं सेवन?
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी गुजरातच्या कंपनीने बनवलेलं 'धमण १' व्हेंटिलेटर अयशस्वी
४५ वर्षापूर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती अचानक गावात आली; कुटुंबाने काय केलं पाहा!